कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे येथील दिशा महिला मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिन खालापूर येथील देवशेतवाडी येथून लांब शाळेत चालत जाणार्या मुलांना सायकल देऊन साजरा झाला. आपल्या मुलांच्या वापरात नसलेल्या सायकल रिपेअर करून गरजू मुलांना प्रवास करण्यासाठी तसेच त्या चिमुकल्या जीवांना उन्हा-पावसात शाळेत जाण्यासाठीचा होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने 13 सायकल देण्यात आल्या.
सायकल हातात मिळताच मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दरम्यान, पाड्यातील मुलींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केला होता. या वेळी त्यांनी आपल्या कलाही सादर केल्या. पाड्यातील क्रीडा क्षेत्रात पारंगत असलेली सुजाताने आपले मनोगत ही व्यक्त केले.
सायकल चालवताना त्या मुलांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद पाहून आपण डोनेट केलेल्या सायकल योग्य ठिकाणी गेल्यानेही एक वेगळेच समाधान या उपक्रमामुळे मिळाले, असे दिशा व्यासपीठाच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी सांगितले. तर पाड्यातील मुलांबरोबर समरस होऊन आनंदात आजचा दिवस दिशा व्यासपीठाचा साजरा झाला. असेच गरजू मुलांसाठी व महिलांसाठी व्यासपीठाअंतर्गत उपक्रम पुढेही राबवले जातील, असे या वेळी दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे यांनी या वेळी सांगितले.
या वेळी मॉडेल व अॅक्टर तसेच मिसेस युनिव्हर्स इंडिया श्रीजिता बॅनर्जी यांची विशेष उपस्थिती लाभली. रणजित सावर्डेकर, नितिन साळवी, विकास ठाकूर, अनिता मागाडे, लिना सावंत, सारिका माळी, दिपा खरात, स्नेहल चेलेकर, सुरेखा आडे, शर्मिला मलणगावे यांच्या सहकार्याने व उपस्थितीने हा उपक्रम यशस्वी झाला.