महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगड परिसरात असलेल्या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून एकही एसटी बस गेली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. एसटीने उपलब्ध कर्मचार्यांच्या सहकार्याने या भागात बसची एक फेरी सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. एसटी कर्मचार्यांचा संप अद्याप सुरूच असल्याने दुर्गम, खेड्यापाड्यातील ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत. महाड एसटी आगारातदेखील निम्म्याहून अधिक गाड्या धूळखात उभ्या आहेत. संपातील काही कर्मचारी हजर झाले असून त्यांच्या बळावर तालुक्यातील काही गाव आणि लांब पल्ल्याच्या फेर्या सुरू केल्या आहेत. मात्र किल्ले रायगड परिसरात अद्याप एकही एसटी बस गेलेली नाही. या भागातील सांदोशी, सावरट, करमर बावले, आमडोशी, पाचाड, रायगडवाडी, हिरकणीवाडी, नेवाळी, पुनाडेवाडी येथील सुमारे दीडशे विद्यार्थी पाचाड, कोंझर, महाड या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. एसटी बस येत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो तर अनेक वेळा पायी चालत यावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. महाड-सांदोशी, महाड-किल्ले रायगड या दोन एसटी बसेस या मार्गावर धावत होत्या. एसटी कर्मचार्यांचा संप सुरू झाल्यापासून या फेर्या बंद झाल्या आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करत खाजगी वाहनाने महाडला यावे लागत आहे. एसटीने मुलांच्या शिक्षणाचा विचार करून दिवसातून दोन वेळा महाड-सांदोशी बस सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महाड एसटी आगारातील 18 चालक कामावर हजर झाले असून त्यांच्या सहकार्याने एसटीच्या पाच गाव फेर्या सुरू आहेत. तर पनवेलकरिता सहा तर बोरिवली, पुणे, ठाणे, मुंबई अशा पंधरा लांबपल्ल्याच्या फेर्या सुरू आहेत.
किल्ले रायगड परिसरातील गावांमधून सुमारे दोनशे विद्यार्थी कोंझर, महाड येथे शिक्षणासाठी येतात. त्यांना सध्या खाजगी प्रवासी वाहतुकीचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. यामुळे एसटीच्या दिवसातून दोन फेर्या या परिसरासाठी सुरू व्हाव्यात.
– संतोष गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते
सध्या जे चालक कामावर हजर झाले आहेत, त्यांच्या बळावर एसटीच्या फेर्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा विचार करून किल्ले रायगड परिसरात महाड-सांदोशी ही बस सुरू केली जाईल.
– शिवाजी जाधव, आगार प्रमुख, महाड