पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी सन 2019-20चा सुधारित आणि सन 2020-21चा मूळ अंदाजपत्रक सादर केलेल्या 945 कोटींची जमा, खर्च 943.42 कोटी आणि शिल्लक 1.59 कोटींच्या अर्थसंकल्पास गुरुवारी (दि. 22) महासभा आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मान्यता दिली. जनतेला कोरोना काळात दिलासा देणारा आणि विकासकामांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प आहे. सन 2019-20मधील कामकाजाचा लेखाजोखा घेऊन सन 2020-21मध्ये कोरोना महामारी असतानाही शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे आर्थिक अरिष्ट ओढवले असताना पनवेलकरांना कोरोनापासून संरक्षण उपचार आणि विकासकामांना गती देणारे अंदाजपत्रक महासभेने मंजूर केले आहे. जमेच्या प्रमुख बाबीत मालमत्ता कर 205 कोटी, विकास शुल्क व फायर प्रीमियम 40 कोटी, 15वा वित्त आयोग 65 कोटी, विविध शासकीय अनुदान अंतर्गत 297 कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. खर्चाच्या प्रमुख बाबीत आस्थापना 68 कोटी, जमीन संपादन 50 कोटी, नगरोत्थान योजना 97 कोटी, नवीन प्रशासकीय भवन 35 कोटी, स्लॅब ड्रेन बांधकाम इत्यादी 22 कोटी, रस्त्यांचे डांबरीकरण 15 कोटी, रस्ते काँक्रीटीकरण 25 कोटी, अग्निशमन व्यवस्था 12 कोटी, विद्युत व्यवस्था 23 कोटी, गावठाण परिसरात पायाभूत सुविधा करणे 25 कोटी यांचा समावेश आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिकेच्या व्यवस्थापकाची भूमिका बजावताना कर्मचारी वेतनासाठी येणारे सहाय्यक अनुदान लवकरच बंद होणार असून, शिक्षण वेतन अनुदान 50 टक्के वर येणार असल्याने महापालिकेची परिपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यासाठी कर आकारणी व उत्पन्नवाढ करावी लागेल, असे सूचित केले. घनकचरा व्यवस्थापनात ओला व सुका कचरा गोळा करण्याची कार्यवाही करण्यासाठी महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड आवश्यक आहे. 10 लाख लोकसंख्येला 20 आरोग्य केंद्र आवश्यक असून, सध्या सहा आरोग्य केंद्र कार्यरत आहेत, असे नमूद करून महापालिका आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यावर भर दिला.
कोरोना नियंत्रणासाठी 15 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्याला मान्यता देताना काही बाबींचा समावेश करण्याचे महापौरांनी सूचित केले आहे.
महापौरांनी सूचित केलेल्या बाबी …
जाहिरात धोरण प्रभावीपणे राबविणे, प्रभाग समितीच्या केलेल्या तरतुदीसाठी प्रभावीपणे वापर करणे, जीएसटी अनुदान मिळण्याकरिता शासनास सुधारित मागणी सादर करणे, कर्मचार्यांसाठी साहित्य खरेदी गमबूट इत्यादी वेळीच करणे, उद्यान विभागात कामे प्रभावीपणे होण्यासाठी विभागाचे बळकटीकरण करून आवश्यकतेनुसार इंजिनियर देण्यात यावा, वृक्षसंवर्धन विभागात वृक्षांचे विविध प्रदर्शन भरवण्यावर भर द्यावा, समाज विकास विभागात वसतिगृह वाचनालय, अभ्यासिका दुरुस्ती-बांधणे याकरिता वाढ करणे, मागासवर्गीय कल्याण निधीमध्ये मागासवर्गीय वसतिगृह विशेषतः मुलींकरिता बांधणे, मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा उदा. विरंगुळा केंद्र इ, राखीव भूखंड स्वच्छता करणे व कुंपण घालणे, आगरी, कोळी, कराडी भवन बनविण्यासाठी प्रस्तावित दोन कोटी अनुदानात वाढ करण्यात यावी, बहुउद्देशीय सभागृह तसेच समाज मंदिर बांधकामामध्ये वारकरी, माथाडी भवन यांची उभारणी, पनवेल महानगरपालिका हद्दीतील आरक्षित जागेत सुसज्ज वाहनतळ उभारण्यात यावे व त्यासाठी पार्किंग टॅक्स हेड करण्यात यावा, कृषी व पशू यांच्यासाठी लेखाशीर्ष तयार करण्यात यावा, उद्यानांमध्ये खेळणी तसेच सुशोभीकरण करणे, वैद्यकीय सेवा यांमध्ये रुग्णालयीन उपकरणांची खरेदी उदा. फ्रिझर, थर्मामीटर, बीपी मशीन इत्यादी तत्काळ करण्यात यावी, जुन्या बांधकामाच्या ड्रेनेज लाइन जोडण्यात याव्यात व नवीन बांधकामाबाबत ड्रेनेज लाइन जोडण्याचा खर्च संबंधितांकडून घेण्यात यावा, ओवे धरण गाळ काढणे आणि वेस्ट वेअर दुरुस्ती करण्यासाठी तरतूद खर्चात वाढ करण्यात यावी, अमृत पाणीपुरवठा योजनेतून नवीन पाण्याच्या टाक्यांचे कामकाज पुनर्बांधणी प्राधान्याने करण्यात यावे, नगरसेवक निधी वाढवण्याबाबत प्रयत्न करणे, स्वच्छतेच्या बाबतीत ओला-सुका कचरा स्वतंत्ररीत्या गोळा करण्यात यावा, अत्याधुनिक मार्केट, कम्युनिटी सेंटर, बागा, ग्रंथालये असावेत, सिडको, एमएमआरडीए निधी प्राप्त करून सुविधांचा दर्जा वाढवण्यात यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती देण्याबाबत यापूर्वी झालेल्या आमसभेच्या ठरावानुसार कार्यवाही करणे, मनपा हद्दीतील स्मशानभूमीत लाकूड, गॅस, वीजपुरवठा मोफत करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, 29 गावे व त्यामधील आदिवासी पाड्यांतील तलाव, विहिरी यांचे संवर्धन करणे, जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित होणार्या शाळांची दुरुस्ती करून त्या शाळांचे भूखंड विकसित करण्यात यावेत. उदाहरणार्थ स्मार्ट स्कूल स्मार्ट लर्निंग स्मार्ट इं इन्फ्रास्ट्रक्चर.
अल्पावधीत प्रगती
सन 2016मध्ये अस्तित्त्वात आलेल्या पनवेल महानगरपालिकेने अल्पावधीतच चांगली प्रगती केली आहे. महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत जनतेने भाजपला स्पष्ट कौल दिला आणि जनतेने टाकलेला विश्वास सत्ताधार्यांनी सार्थ ठरविला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, सभापती, नगरसेवक-नगरसेविका यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. जनतेला विविध सोयीसुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. विकासकामांमध्ये शहरी पट्टा, सिडको वसाहती, ग्रामीण भाग असे सर्वत्र संतुलन राखले जात आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प संतुलित आणि विकासाला चालना देणारा आहे. नागरिकांना सोयीसुविधा देऊन त्यांचे जीवनमान सुकर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका