Breaking News

ऑफलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई : प्रतिनिधी
ऑफलाइन परीक्षेविरोधात राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला आदी ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी सोमवारी (दि. 31) रस्त्यावर उतरले. धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे सांगितले होते, मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचे जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावरदेखील विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याचा उद्रेक होऊन परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी करीत राज्यात अनेक ठिकाणी विद्यार्थी सोमवारी रस्त्यावर उतरले.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वर्षभर शाळा ऑनलाइन होत्या. ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर परीक्षा ऑफलाइन का, असा सवाल आंदोलक विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री आणि राज्य सरकारला केला आहे. ऑफलाइन परीक्षा घेणे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका, असे सांगत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला.
धारावीदेखील मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नमते घेत प्रतिक्रिया दिली. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. त्यानुसार आम्ही शिक्षणतज्ज्ञांशी देखील चर्चा करू. विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार आहे, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply