Saturday , June 3 2023
Breaking News

कुडाळच्या ‘बिलिमारो’ने जिंकला मानाचा अटल करंडक

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण

पनवेल : प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धा कोण जिंकणार याची अवघ्या महाराष्ट्राला लागलेली उत्सुकता अखेर रविवारी (दि. 30) संपली. तीन दिवस चाललेल्या महाअंतिम फेरीत कुडाळ येथील ’ढ’ मंडळी या संस्थेच्या बिलिमारो नामक एकांकिकाने बाजी मारत एक लाख रुपये आणि मानाच्या आठव्या अटल करंडकावर आपले नाव कोरले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब बिलिमारो एकांकिकेमधील रंगा, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब हायब्रिड एकांकिकांमधील ज्ञानेश्वरी मंडलिक हिने पटकाविले. मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांना ’गौरव रंगभूमीचा’ जीवन गौरव पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात आले. 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उपाध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे दरवर्षीप्रमाणे नेटके व दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण समारंभही उत्साहात झाला.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन  देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, महापौर डॉ. कविता चौतमोल, स्पर्धेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ओमकार भोजने, अभिनेते मंगेश कदम, परीक्षक सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते विजय केंकरे, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सुप्रसिद्ध लेखक व अभिनेता संजय मोने, सुप्रसिद्ध लेखक डॉ. नितीन आरेकर, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, ‘हास्य जत्रा’फेम शिवाली परब, वनिता खरात, निखिल बने, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सुप्रसिद्ध सिने-नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, श्री. व सौ. नील कोठारी, स्पर्धा सचिव श्यामनाथ पुंडे, प्राथमिक फेरीचे परीक्षक अभिजीत झुंजारराव, प्रमोद शेलार, अमोल खेर, स्मिता गांधी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयूरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, सांस्कृतिक प्रकोष्ठच्या कोकण विभाग सहसंयोजिका अक्षया चितळे, सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन आदी उपस्थित होते
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई पुढे म्हणाले की, आज मला आनंद होत आहे, कारण 33 वर्षांपूर्वी मीसुद्धा तुमच्या जागी होतो. याच तुमच्या पद्धतीने 25 जागांमध्ये निवड होऊन आपल्याला पारितोषिक मिळणार का याची वाट पाहत होतो. माझ्या आयुष्याचा पहिला सेट मी नाटकाचा लावलेला, तोही एकांकिका स्पर्धेचा. मी आता 33 वर्षांनंतर एका महत्त्वाकांक्षी प्रयोग करतोय. महाराणा प्रताप यांच्यावर मोठी सिरिज करतोय. मला असे वाटतेय की एवढे स्पर्धक इथे आलेत. त्यांच्यासाठी आपण एन.डी. स्टुडिओत ऑडिशन ठेऊया. स्टेजवर बोलून तुमच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मला असे वाटते की  प्रत्यक्षात काही तरी घडवायला पाहिजे. या वेळी त्यांनी स्पर्धेत झालेल्या 108 एकांकिका पाहण्याची इच्छाही व्यक्त केली.
या वेळी नितीन देसाई यांनी ठाकूर पिता-पुत्रांचे कौतुक केले. ते म्हणाले, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एवढे कार्य केले आहे. प्रशांतजी आणि परेशजीदेखील इतके काही करताहेत, तर माझ्या माध्यमातूनही काही करावे असे वाटते. आपल्या महाराष्ट्रात, या रायगडमध्ये भरपूर कलाकार आहेत. फक्त कमी पडतो आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची जिद्द. भारतीय चित्रपटसृष्टी दादासाहेब फाळके या मराठी माणसाने उभारली. त्यानंतर कोट्यवधींचे त्यामध्ये भांडवल येऊन ही इंडस्ट्री फोफावली, पण आपण थोडेसे कोठेतरी त्यामध्ये मागे असू, म्हणून माझा एक खारीचा वाटा आहे. आपण त्यामध्ये कोठे तरी पुढे जावे यासाठी मी माझ्या कार्यक्रमात किंवा प्रोजेक्टमध्ये आपल्या लोकांना स्थान देत असतो. आजच्या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो की महाराणा प्रताप सिरीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे ऑडिशनसाठी स्वागत करतो.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, लहानपणी आपण कोणत्या क्षेत्र चमकणार हे माहिती नसते. चांगली दिशा घेतली असेल आणि त्याला घडवण्याचे डायरेक्ट-इन डायरेक्ट प्रयत्न लहानपणी केले, तर भावी काळातील एक मोठे व्यक्तिमत्त्व तयार झालेले आपल्याला दिसते. मीही असाच एक गरीब मजुरी करणारा मुलगा होतो, पण शिक्षण झाले. शिक्षकाची नोकरी लागली. मला मराठी वाड्ःमयाची आवड होती. साहित्याची गोडी असल्याने नाटक बघायला जाण्याचा मला छंद होता. मी वेळ मिळेल तेव्हा ठाण्याला गडकरी रंगायतन, दादरला शिवाजी मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर ते विलेपार्लेपर्यंत जात होतो. मी प्रशांत आणि परेशला घेऊन जात असे.त्या वेळी मला माहीत नव्हते की, पुढे जाऊन ते अशा एकांकिका स्पर्धा भरवतील. आज तुम्ही उभ्या महाराष्ट्रातून आलात. आम्हाला आमच्या आयुष्यात जे जमले नाही ते काम तुम्ही छानपैकी केलेत याचा मला अभिमान आहे.

एकांकिकेतून चांगले कलाकार घडतात -नितीन देसाई
अटल करंडक स्पर्धेचे हे पारितोषिक महत्त्वाचे आहे, कारण या स्पर्धेतून पुढे आलेल्या कलाकारांनी महत्त्वाचे योगदान मराठी रंगभूमीला दिलेले नंतर पाहायला मिळते. नाटकाच्या एकांकिकेत जो उभा राहतो तो नेहमीच चांगला कलाकार असतो. म्हणून मी आजच्या निमित्ताने तुमचे महाराणा प्रताप सिरीजच्या ऑडिशनसाठी स्वागत करतो, असे खुले आवताण सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कलाकारांना दिले.

भावी काळातले तुम्ही चमकते तारे -लोकनेते रामशेठ ठाकूर
अध्यक्षीय भाषणात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, भावी काळातले तुम्ही चमकते तारे असणार आहात. तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आपल्यासारखी नाट्यवेडी मंडळी खर्‍या अर्थाने मराठी संस्कृती जागृत ठेवण्याचे काम करतात. मराठी माणूस ज्या क्षेत्रात जातो तेथे ध्येयवेडा होतो. राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात काम करणे आणि कला गाजवणे हा फार मोठा गुण आहे. त्या दृष्टीने तुम्ही फार मोठे कलाकार व्हा. मोठी व्यक्ती व्हा, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो.

कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश -सभागृह नेते परेश ठाकूर
अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही सन 2005मध्ये मल्हार नाट्य करंडकाद्वारे रायगड जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा सुरू केली होती. यामध्ये आमचा हेतू अतिशय प्रामाणिक असा होता तो म्हणजे येथील कलाकारांना प्रोत्साहन देणे, कलेला उत्तेजन देणे आणि याद्वारे कलेची सेवा करणे. पनवेल परिसरात जास्तीत जास्त नाट्य संस्कृतीचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने आम्ही स्पर्धा सुरू केली होती. मग राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहचण्यासाठी 2014 साली अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार आम्ही ही अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून आम्हाला चांगला प्रतिसाद लाभलेला आहे, कारण या स्पर्धेच्या आयोजनाच्या मागे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा अतिशय मोलाचा सहभाग आहे, असे नमूद करून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकात मंडळाने आतापर्यंत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

पनवेल महापालिकेच्या वतीने मी उपस्थित सर्वांचे स्वागत करते. आज मराठीमध्ये दिग्गज कलाकार आल्याने मराठी रंगभूमी, चित्रपट व नाटकांना सोनेरी दिवस आले असे म्हणायला हवे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने पनवेलमध्ये नाट्यगृह झाल्यावर अतिशय उत्कृष्ट, दर्जेदार नाटके आणि विविध स्पर्धा इथे होत आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या कलाकारांची भेट होते. आपण पनवेलमध्ये येऊन स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आभार व सगळ्यांना शुभेच्छा!
 -डॉ. कविता चौतमोल, महापौर

अटल करंडक एकांकिका स्पर्धा राज्यस्तरीय आहे. गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरातील कलाकार यामध्ये स्फूर्तीने भाग घेतात. स्पर्धक एकत्र येतात तो क्षण आम्हाला अनुभवायला मिळतो, जो आजच्या घडीला तितकाच अत्यंत महत्त्वाचा आहे. तोच प्रवास प्रत्येक एकांकिका आणि कलाकाराचा आहे. ही केवळ एक स्पर्धा नाही, तर चळवळ म्हणून चालवली जाते.
-ओमकार भोजने, स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

स्पर्धेचा सविस्तर निकाल
सर्वोत्कृष्ट एकांकिका
प्रथम क्रमांक-बिलिमारो (’ढ’ मंडळी, कुडाळ) एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक-मानलेली गर्लफ्रेंड (इंद्रधनू, मुंबई) 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-हायब्रीड (ऍबस्ट्रॅक्ट थिएटर, डोंबिवली) 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- मौनांतर (नागाबादेवी कलामंच, वसई) 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-चिऊताई चिऊताई दार उघड (स्पॉट लाईट, पनवेल) पाच हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-जनावर (प्राण, मुंबई) पाच हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
सर्वोत्कृष्ट अभिनेता (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक-रंगा (बिलिमारो) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-सुनिल हरिश्चंद्र (मानलेली गर्लफ्रेंड) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-शांती (बिलिमारो) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-भावेश कुटला (हायब्रीड) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-मल्हार (मौनांतर) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक-ज्ञानेश्वरी मंडलिक (हायब्रिड) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-निहारिका राजदत्त (मानलेली गर्लफ्रेंड ) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-अर्चिता मोरे (राकस) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-सिद्धी शिंदे (लेखक) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेेजनार्थ-सायली रोंधळ (विषाद) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक-बिलिमारो (दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक-मानलेली गर्लफ्रेंड (एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह), तृतीय क्रमांक-नितीन सावळे (हायब्रिड) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-चिऊताई चिऊताई दार उघड (500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह), उत्तेजनार्थ-मौनांतर (प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह)
सर्वोत्कृष्ट लेखक (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक-सुनिल हरिश्चंद्र (मानलेली गर्लफ्रेंड) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-तेजस म्हस्के (बिलिमारो) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-रोहन साटम (मौनांतर) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-प्रसाद पंडित (साबण) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-नितीन सावळे (हायब्रिड) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
सर्वोत्कृष्ट संगीत (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक- बिलिमारो, दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-प्रसाद, (रुईया) एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-अक्षय धांगट (राकस), एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-चिऊताई चिऊताई दार उघड, 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-हर्ष-विजय (विषाद) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
सर्वोत्कृष्ट नेपथ्य (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक-रोहित श्रीष (पार्वती सदर), दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-चिऊताई चिऊताई दार उघड, एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-मानलेली गर्लफ्रेंड, एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-आशिष पवार (हायब्रिड) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-कविता निकाळजे (विषाद)  प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक-प्रसाद (रुईया) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-चिऊताई चिऊताई दार उघड, एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक- राजेश शिंदे (हायब्रिड) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-जनावर, 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-बिलिमारो (सचिन कोंडास्कर) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
 सर्वोत्कृष्ट रंगभूषा (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक-किशोर नाईक, दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-प्रणेश लोगडे एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-कुणिका पाटील, एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-राहुल मौले, 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
सर्वोत्कृष्ट वेशभूषा (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक-किशोर नाईक, दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-श्रेया जयराम म्हात्रे, एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-आशिष एकनाथ पवार, एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-विनय महादेव गोडे, 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
रायगड जिल्हा प्राथमिक फेरीकरिता विशेष पारितोषिके
प्रथम क्रमांक-किरण सोष्टे, 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-डॉ. पी. आर. करुळकर, सात हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-गणेश जगताप, पाच हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका-साबण (मुद्रा कल्याण) सात हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, महाराष्ट्रातील अस्सल मायबोली एकांकिका-विषाद (रंगपंढरी पुणे) सात हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, लोककलेवर आधारित एकांकिका-राकस (कलासक्त मुंबई) सात हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार-राहुल शिरसाठ (साबण) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार-वरद पाटील (मौनांतर) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply