Breaking News

जि.प. आरक्षणात प्रस्थापितांना धक्का

अलिबाग : प्रतिनिधी

आगामी निवडणुकांकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या जागांसाठी गुरुवारी (दि. 28)आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेकांनी पूर्वतयारी केली होती, परंतु आरक्षणामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडली आहे. अनेकांचे मतदार संघ राखीव झाल्याने त्यांना पर्यायी मतदार संघ शोधावा लागणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर, माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, माजी सदस्य भावना पाटील, राजीव साबळे, गीता जाधव यांचाही त्यात समावेश आहे.

माणगावचे अ‍ॅड. राजीव साबळे आणि प्रमोद घोसाळकर इच्छुक असलेला लोणेरे मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांचा मापगाव मतदार संघ ओबीसींसाठी राखीव झाल्याने त्यांना नवीन मतदार संघ शोधावा लागणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांचा चौल मतदार संघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव यांचा महागाव मतदारसंघ ओबींसींसाठी राखीव झाल्याने त्यांची संधी हुकणार आहे.

शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे इच्छुक असलेला गोरेगाव मतदार संघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यांना पत्नी आरती मोरे यांना उभे करावे लागेल असे दिसते. अलिबागच्या शहापूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे अमित नाईक तयारीत होते. परंतु तो मतदार  संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांच्या मनसुब्यावर पाणी पडले आहे. वहूर मतदार संघ ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने माजी सदस्य जितेंद्र सावंत यांची अडचण झाली आहे. याशिवाय किशोर जैन (नागोठणे), चंद्रकांत कळंबे (देवळे) यांचेही मतदार संघ राखीव झाल्याने त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. रोहा तालुक्यातील वरसे मतदार संघ अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची अडचण होणार आहे.

या आरक्षण सोडतीतून अनेकांची सुटकाही झाली आहे. माजी अध्यक्षा अ‍ॅड. नीलिमा पाटील यांचा पाबळ मतदार संघ ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. मोर्बा मतदार संघ खुला राहिल्याने अस्लम राऊत यांना संधी मिळू शकते.

पेण तालुक्यात पूर्वी जिल्हा परिषदेचे पाच मतदार संघ होते. फेररचनेमध्ये ही संख्या एकने वाढून सहा झाली आहे. त्यातील पाच मतदार संघ हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. यामध्ये जिते, दादर, वढाव, वडखळ  सर्वसाधारण महिला तर पाबळ मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. एकमेव शिहू मतदार संघ सर्वसाधारण राहिला आहे. म्हसळा तालुक्यातील पाभरे व वरवठणे हे दोन्ही मतदार संघ  सर्वसाधारण राहिले आहेत.त्यामुळे येथे सर्वच पक्षांच्या इच्छुकांची गर्दी असेल. आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुक तयारीला लागले आहेत. आपले मूळ मतदार संघ आरक्षित झाल्यामुळे पर्यायी मतदारसंघ शोधून तेथे तयारी करावी लागणार आहे. आशा उमेदवारांनी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply