Breaking News

तात्पुरते 837 आरोग्यसेवक कार्यमुक्त

नवी मुंबई महापालिकेकडून भरती प्रक्रियाही रद्द

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनाची तिसरी लाट जेवढ्या वेगाने पसरली तेवढ्याच वेगाने नियंत्रणात आली आहे. शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालिका प्रशासनाने तात्पुरत्या आरोग्यसेवकांचा भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि. 1) 837 जणांना कार्यमुक्त करण्यात आले असून राबवण्यात येणारी भरती प्रक्रियाही थांबवली आहे.

नवी मुंबईत मार्च 2020मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू वाढत गेली. आधीच तोकडी असलेली पालिकेची आरोग्य सेवा कमी पडत गेली. त्यामुळे पालिका प्रशासनाला आरोग्य सुविधांत वाढ करण्याबरोबर मनुष्यबळ भरती मोठ्या प्रमाणात करावी लागली. महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवून 1911 जणांची भरती केली होती. पहिली लाट ओसरल्यानंतर काळजी केंद्रे बंद करीत हे कर्मचारी कमी केले होते. या वेळी या कर्मचार्‍यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर दुसर्‍या लाटेत शहरातील परिस्थिती आणखी बिकट झाली होती. या वेळी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर ही लाट ओसरल्यानंतर पालिका प्रशासनाने काळजी केंद्रे पूर्ण बंद न करता ती फक्त कुलूपबंद केली, तसेच काही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. ही प्रक्रिया सुरू असतानाच तिसरी लाट सुरू झाली व ती प्रचंड वेगाने पसरली. त्यामुळे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मागे घेत नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र जेवढ्या वेगाने संसर्ग पसरला तेवढ्याच वेगाने ही लाट आटोक्यात आली. त्यात लक्षणेविरहित रुग्ण अधिक असल्याने घरीच उपचारावर अनेकांनी भर दिला. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली, मात्र आरोग्य व्यवस्था तेवढ्या प्रमाणात वाढवावी लागली नाही. आता शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तात्पुरत्या आरोग्य कर्मचार्‍यांचा बोजा कमी करण्याचे ठरवले आहे. मंगळवारी 837 जणांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने लागू केलेले निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण हे गृहीत धरण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या पहिल्या मात्रेचे प्रमाण हे 90 टक्के आणि दुसर्‍या मात्रेचे प्रमाण हे 70 टक्के असणे आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यात अद्यापही पहिल्या मात्रेचे प्रमाण हे सुमारे 87 टक्के इतकेच आहे. ठाणे जिल्ह्यातील 73 लाख 46 हजार 792 गृहीत लाभार्थ्यांपैकी 67 लाख 68 हजार 209 नागरिकांना लशीची पहिली मात्रा, तर 53 लाख 38 हजार 751 नागरिकांना लशीची दुसरी मात्रा मिळाली आहे.

नवी मुंबई महापालिकेने कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवली होती, परंतु सद्य:स्थितीत आवश्यकतेनुसार कर्मचारी, डॉक्टर यांना ठेवून अतिरिक्त डॉक्टर तसेच विविध पदांवरील तात्पुरत्या सेवेतील कर्मचारी कमी केले आहेत.

-संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply