Breaking News

कर्जतमध्ये मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत

कर्जत : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी येथील रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे माजी सचिव नितीन परमार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.

पुण्याहून मुंबईला जाणार्‍या सर्व मेल, एक्सप्रेस रेल्वे गाड्या पुर्वी कर्जत स्थानकात थांबत असत, मात्र कोरोनाची लाट आल्यापासून कर्जत स्थानकातील सर्व मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. आता कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही कर्जत स्थानकातील एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरु झालेले  नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

मुंबई, तसेच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आदी रेल्वे मार्गावरून जाणार्‍या मेल, एक्सप्रेस गाड्या पुर्वी कर्जत स्थानकात थांबत असत. त्यामुळे पुण्यावरून या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना कर्जत स्थानकात उतरून पुढे लोकल पकडून माथेरान, नेरळ, पनवेल, खोपोली, अंबरनाथ आदी त्यांना हवे असलेल्या ठिकाणी जाता येत होते. मात्र आता या गाड्या कर्जतला न थांबता पुढे जाऊन थेट कल्याण स्थानकात थांबत असल्याने प्रवाशांना कल्याणवरून लोकल पकडून पुन्हा मागचा तथा उलटा प्रवास करावा लागत आहे. त्यामध्ये प्रवाशांचा विनाकारण अधिकचा वेळ व पैसा जात असून मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे रेल्वे प्रवाशातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीची दखल घेऊन सर्व मेल, एक्सप्रेक्स गाड्यांचे कर्जत रेल्वे स्थानकातील थांबे पूर्वीसारखेच त्वरित सुरू करावेत, या मागणीचे निवेदन  कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे माजी सचिव नितीन परमार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिले.

थांबे रद्द झालेल्या रेल्वेगाड्या 

चेन्नई मेल, कोणार्क एक्सप्रेस, कन्याकुमारी एक्सप्रेस, गडक एक्सप्रेस, सिकंदराबाद एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस, लातूर एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, हैदराबाद एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply