
पेण : प्रतिनिधी
तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास असल्याने आमदार फंडातून 50 लाखाचा निधी देऊन वडखळ कोळवे गावाचा विकास करण्याचे ध्येय्य ठेवले आहे. कोळवे व परिसरातील गावांनी आपल्याला बहुमत दिले असून येथील नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले.
कोळवे गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होेते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, पं.स. सदस्य प्रदीप म्हात्रे, प्रतीक मढवी, माजी उपसरपंच रवींद्र म्हात्रे आदीसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे की, वडखळ कोळवे गावावर माझे नितांत प्रेम आहे. मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा या गावचा विकास केला होता, त्यानंतर दहा पंधरा वर्षे या गावाकडे विरोधी पक्षांनी ढुंकूनही पाहिले नाही. परंतु तुम्ही मला आमदार केल्यामुळे गावाचा विकास करणे माझे आद्य कर्तव्य समजतो. कोळवे ते वडखळ या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 15 वर्षांपूर्वी माझ्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर पंधरा वर्ष या रस्त्याकडे विरोधी पक्षांनी पाहिले नाही. त्यामुळे या रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था या रस्त्याचे झाली आहे. ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यामुळे मी कोळवे ते वडखळ रस्त्यासाठी 50 लाखाचा निधी दिला आहे. हा रस्ता दहा दिवसात पूर्ण होणार असल्याचेही आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी सांगितले.
वडखळ विभागात दोन विसर्जन घाट, दोन व्यायाम शाळा उभारण्यासाठी आमदार फंडातून निधी देण्यात आला असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. यावेळी कोळवे ग्रामस्थांनी आमदार रविशेठ पाटील यांचा सत्कार केला.
जल जीवन मिशन अंतर्गत घरात नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या वर्षात प्रत्येक घरात मानसी 65 लिटर पाणी तसेच जेएसडब्ल्यू सीएसआर फंडतून गावासाठी निधी मिळवून देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper