Breaking News

नव्या पिढीची ‘ऑनलाइन’ वाटचाल भरकटतेय?

पालक म्हणून आपल्या मुलांना सोडून द्यायचंय मुक्तपणे अवकाशात विहारायला, पण भीती आहे पोकळीत हरवण्याची. मिठीत घट्ट धरून प्रेम व्यक्त करायचंय, पण भीती वाटते त्याच्या गुदमरण्याची. मुलांनी खूप खूप मोठं व्हावं असं वाटतंय कारण भीती आहे समाजाच्या विचारांतील खुजेपणाची. म्हणूनच पालकांची बर्‍याचदा  विचारणा होते, कोणतं बोर्ड चांगलं? एसएससी, सीबीएससी की आयसीएससी? त्यांना प्रतिप्रश्न विचारला की, तुम्हाला मुलाला शिकवायचंय की स्टेटस मेंटेन करायचाय? मग काही वेळ नि:शब्दता. किती हा विचारांचा गोंधळ. मुलांना कुठे शिकवतोय, त्यापेक्षा मुलं काय शिकतायत आणि खरोखरच शिकतायत की, नाही हे महत्वाचं नाही का? कोण कुठला उठतो आणि युवकांना भडकवतो. हे केवळ आश्चर्यकारक नाही तर वेदनाजनकही आहे. मुद्दा दहावी-बारावीतील मुलांच्या केवळ आंदोलनाचा नाही तर ही मुलं कोणताही विचार न करता कशी बिनडोकपणे सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत, याचाही आहे. त्याही पलीकडे, त्यांचे सहजपणे ‘ब्रेन वॉश’ होत आहे, (बर्‍याचदा धर्माच्या नावाखालीही) ही अधिक गंभीर बाब आहे. ऑनलाइन परीक्षा घ्याव्यात यासाठी एका भाऊने सोशल मिडीयावरून मोहीम चालवली आणि त्याला प्रतिसाद देत मुले रस्त्यावर उतरली. त्यातून या मुलांची विचारशक्ती किती खुंटली आहे आणि त्यांच्यावरील पालकांचे नियंत्रण कसे सुटले आहे, हे प्रकर्षाने दिसून येते. आज कोरोनाच्या केसेस झपाट्याने खाली गेल्या आहेत. काही प्रमाणात त्या दाखल होत असल्या तरी त्यासाठी रुग्णालयात जाण्याची वेळ येत नाही. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरू होणे, ही काळाची गरज होती. घरात बसून मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक कुवतीवर अपरिमित असा परिणाम होत आहे. प्रख्यात अर्थतज्ज्ञ रघुराम राजन म्हणाले त्याप्रमाणे शाळेत न गेल्यामुळे अख्खी पिढी वाया जाईल की काय अशी भीती वाटू लागली आहे. मुलांमध्ये ‘स्पीच डीले’ सारख्या गंभीर समस्या दिसू लागल्या आहेत. अशा वेळी परीक्षा ऑनलाईन घ्या म्हणून जर मुले रस्त्यावर उतरत असतील तर त्यांना योग्य वेळी रोखण्यासाठी पालक कमी पडत आहेत, हेसुद्धा नाकारता येत नाही. मुले आणि पालक यांच्यातील संवाद खुंटला आहे, कारण सोशल मिडिया दोघांच्यामध्ये भिंतीप्रमाणे उभा आहे. बरेचसे पालक शाळा पुन्हा सुरु करण्यालाही विरोध करतात. हीच मुले आज हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, धार्मिक स्थळांवर फिरताना आणि लग्नसमारंभात बिनदिक्कत सामील होताना दिसतात. त्यांचे पालकही त्यांच्याबरोबर असतात. मग अशावेळी कोरोना कुठे जातो? विद्यार्थी आणि पालकांमधील हा विरोधाभास आणि ढोंगीपणा नाही का? गतवर्षी कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना आणि हा साथरोग टीपेवर असताना सरकारने या परीक्षा ऑनलाइन घेता येतील का, याची चाचपणी केली आणि तशा घेता येणे शक्य नाही म्हणून मुलांना सरासरी गुण देत पुढच्या इयत्तेत ढकलले होते. आज कोरोनाची परिस्थिती पहिल्या किंवा दुसर्‍या लाटेएवढी भयानक नाही. जगभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ आज शाळा सुरु होण्याच्या बाजूचे आहेत. मग मुले आणि त्यांचे पालक ऑफलाइन परीक्षेला विरोध का करतात? ऑनलाइन परीक्षेचा ‘शॉर्टकट’ दिसल्याने ही मुले सैरभैर झाली असावीत का? ऑनलाइन परीक्षा देणे सोपे असते, तिथे कॉपी करत भरघोस मार्कांची हमी असते, हे सत्यही आता पुढे आले आहे. त्यामुळेही ही मुले भरकटली असावीत. आंदोलनाचा हा एक मुद्दा सोडला तर आणखी दोन गंभीर गोष्टी कुमार व पौगंडावस्थेतील या मुलांच्या बाबतीत पुढे येत आहेत. समाज माध्यमांच्या आहारी गेलेल्या मुलांना कोणीही उठतो आणि एखाद्या पोस्टद्वारे आपल्या नादी लावतो आहे हे भयानक आहे. आवाहन करणारा कोण आहे, त्याची देहबोली, राहणीमान कसे आहे आणि त्याने केलेल्या आवाहनात किती तथ्य आहे, याचा विचार करण्याची कुवत 15-17 वर्षांच्या या मुलांमध्ये असू नये? तसे भान मुलांना देण्याचे तारतम्य पालकांना असू नये, ही अधिक गंभीर बाब आहे. ‘बुल्लीबाई’ आणि ‘क्लब हाउस’ अ‍ॅपच्या अलीकडील प्रकरणांमध्ये अटक झालेले आरोपी हे 18 ते 22 वर्षांचे आहेत. म्हणजे आपण काय करतोय हे कळण्याचेही त्यांचे वय असावे का, अशी शंका यावी. या दोन्ही प्रकरणांमध्ये या मुलांकडून मुस्लीम महिलांबद्दल अत्यंत अर्वाच्य, अश्लील आणि द्वेषमूलक भाषा वापरली गेली. याचा अर्थ स्पष्ट आहे, या मुलांचा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे. त्यांचे ‘ब्रेनवॉश’ केले जात आहे. हा बोलविता धनी राहतो बाजूला, गजाआड जातात ती ही कोवळी मुले. यातील काहीं मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे की, मुले त्यांच्या खोलीत दार लावून सतत मोबाइल आणि संगणकावर व्यग्र असायची. ती काय करताहेत यावर त्यांचे अजिबात नियंत्रण नसायचे आणि त्यातूनच या मुलांचे ब्रेनवॉश होत होता. या पालकांचीही अवस्था कसाबच्या आईसारखीच असावी. परीक्षेविरोधी आंदोलन किंवा समाज  माध्यमांच्या आहारी जाणे यापेक्षाही गंभीर आहे ते हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून होणारे या मुलांचे ‘ब्रेन-वॉश’. बर्‍याचदा खोटी माहिती मनावर बिंबवून मुलांच्या मनात तेढ निर्माण केली जाणार असेल आणि त्याला एक अख्खी पिढी वश होणार असेल तर या देशाला, आपल्या समाजाला, आणि पर्यायाने आपल्या घराला देवसुद्धा तारू शकणार नाही.

-नितीन देशमुख

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply