कर्जत : प्रतिनिधी
आपली मायबोली मराठी भाषा आपण जपली तरच आपल्या संस्कृतीची जपणूक होईल, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व व्याख्याते सागर सुर्वे यांनी कर्जतमध्ये केले. कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने सेमिनार हॉलमध्ये मराठी राजभाषा दिनाचे आयोजन केले होते. सागर सुर्वे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सुर्वे यांनी विविध दाखले देत मराठी भाषेतील बारीकसारीक खाचा-खोचा सांगितल्या. प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. एखादी गोष्ट आपल्याला मराठीत सांगितली तर पटकन समजते. त्यामुळे आपल्या भाषेला जपले पाहिजे, असे महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. मनीषा चौधरी यांनी केले. प्रा. अमोल बोराडे, मधुकर सुर्वे, डॉ. अमोल चांदेकर, प्रा. निलोफर खान, रेवती देशपांडे, सुहास गुप्ते आदिंसह विद्यार्थी, शिक्षक या वेळी उपस्थित होते.