Breaking News

महाशिवरात्रीनिमित्त घुमला हर हर महादेवचा गजर

विविध शिवमंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाशिवरात्रीचे औचित्य साधून पनवेलमधील विविध शंकर मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमांचे पालन करूनच भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.

पनवेलमधील कामोठे, खांदेश्वर येथील शिवमंदिरांमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. अभिषेक, होम हवनानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. करंजाडे वसाहतीतील सेक्टर 3 येथील ओम नमः शिवाय कलश सोसायटीमध्ये मंगळवारी भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी यावेळी विविध आकर्षक व सामाजिक संदेश देणार्‍या रांगोळ्या काढल्या होत्या. प्रकाश महाडिक व दीपक सोनारघरे यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसंगी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, पोलीस पाटील कुणाल लोंढे, भाजप विभागीय अध्यक्ष कर्ण शेलार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोसायटीतील रहिवाश्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वेशभूषा स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम, प्रसाद वाटप यासारख्या विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. लवकरच करंजाडे ग्रामपंचायतीच्यावतीने पंचक्रोशीतील भव्यदिव्य स्वरूपातील रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी यावेळी दिली.

रसायनी परिसरातील आपटा गुळसुंदे व पाताळगंगा रशेश्वर मंदिरात सकाळी लवकर महापूजा, प्रार्थना, अभिषेक केल्यानंतर यात्रा भरली व हळूहळू भाविक येण्यास सुरुवात झाली. तर चौक गाव येथील धान्येश्वर मंदिरातही शिवभक्तांनी दर्शनासाठी व जत्रेसाठी आवर्जून हजेरी लावली. आदिवासी समाज या जत्रेसाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना दिसून येतो. दिवसभर ‘शंभो शंकर, हर हर महादेव’ अशा घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता. येथील ग्रामपंचायतीतर्फे येथे स्वच्छतेचे व पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले होते.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply