Breaking News

रोहा-कोलाड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

धाटाव : प्रतिनिधी

रोहा-कोलाड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी माती मिश्रीत बारीक खडीचा वापर केला जात आहे. त्यावरून वाहने वेगात गेल्यानंतर रस्त्यावर अक्षरशः धुळीचे लोट उसळतात. या धुळीच्या साम्राज्यामुळे रोज ये-जा करणारे प्रवासी, कामगार, विद्यार्थी, ग्रामस्थ यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.

रोहा ते कोलाड हा रस्ता 11किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर जागोजाग लहान मोठे खड्डे पडले होते. त्यात माती मिश्रीत बारीक खडी टाकून रस्त्याची डागडूजी केली जात आहे. या बारीक खडी वरूनच वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावरून मोठी वाहने धावतात, तेव्हा प्रचंड धूळ उडून समोरचे वाहन काहीकाळ दिसेनासे होते. त्यामुळे दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर दिवसातून एकदाही पाणी मारले जात नाही. तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर सतत धुळीचे साम्राज्य असते. ही धूळ श्वसनावाटे शरीरात जावून अनेक प्रवाशांना सर्दी, खोकला, कफ, घसा दुखणे असे त्रास सुरु झाले आहेत. अनेक शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याची याच रस्त्यावरून ने-आण करतात. या भाजीवर धुळीचा थर बसतो. त्यामुळे शेतकरी व ग्राहक हैराण झाले आहेत.

या रस्त्यावर ठेकेदाराने दिवसातून किमान दोनवेळा  पाणी टाकावे तसेच रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply