Breaking News

महिला दिन विशेष

-ठमाताई अनंता पवार

कर्जत तालुक्यातील जांभिवली येथे वनवासी आश्रम सुरू झाला, तेंव्हा तेथील आदिवासी मुलांना भाकरी करून देण्यासाठी ठमाताई अनंता पवार (वय 60, मु. गौरकामत, ता. कर्जत) जात असत. त्यावेळी त्यांना आपल्या आदिवासी समाजाच्या दुर्दशेची स्थिती समजली. आदिवासी पुरुषांबरोबर महिलासुद्धा व्यसनाधीन होत्या. पुरुषांच्या बरोबरीने महिला काम आणि मद्यपान करीत असत. मोलमजुरीतून मिळालेला पैसा व्यसनासाठी संपवित असल्याने कुटुंबाची हेळसांड होत असे. तसेच ही सर्व कुटुंबे अंधश्रद्धेच्या मागे असत. हे सारे ठमाताईंनी पाहिले आणि समाजासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचे ठरविले.   पूर्णपणे आशिक्षित असल्याने ठमाताई यांनी प्रथम शिकायचे ठरविले. भाकरी करता करता त्यांनी पीठावर रेघोट्या मारून अ, आ, इ, ई….. शिकण्याचा प्रयत्न केला. आश्रमात असलेल्या कुंटे काका-काकू  या दाम्पत्याने ठमाताईंना शिकविण्याचे ठरविले. दोन मुले झाल्यानंतर ठमाताईंनी पाटी आणि पेन्सिल हाती घेतली आणि शिक्षणाचे कवाड आपल्यासाठी किलकिले केले. थोडेफार शिक्षण झाल्यावर त्यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला. प्रथम त्यांनी आदिवासी महिलांना व्यसनापासून दूर केले. त्यांना थोडेफार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हाती घेतले. ’महिला शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते’ याचा त्यांना अनुभव आला. ठमाताईंनी आदिवासी महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्या मुलांना शाळेत पाठवू लागल्या. ठमाताईंनी भजनी मंडळे स्थापन करून असंख्य आदिवासी महिलांमध्ये भजनाची आवड निर्माण करून त्यांना परमार्थाकडे नेण्याचा मार्ग खुला करून दिला. ठमाताईंमुळे अनेक आदिवासी मुले-मुली घडल्या काही उच्च पदावर आहेत. ठमाताईंच्या या कार्यची दखल राज्य शासनाने  घेतली व 1998 साली त्यांना आदिवासी सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनतर केंद्र सरकारने 2002 साली तत्कालीन उपराष्ट्रपती भैरवसिंग शेखावत यांच्या हस्ते स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन गौरवीत केले. तसेच 2012 साली  झी मराठी वाहिनीने आदर्श समाजसेविका म्हणून सन्मानित केले आहे. ठमाताई पवार त्यांना राज्यभरातील अनेक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

शब्दांकन ः विजय मांडे 

…………………………………………………….   ………………………………………………….

– रेखा प्रभाकर मोरे

1980 साली चार मुलींना घेवून रेखा प्रभाकर मोरे यांनी घराच्यात अंगणात टेलरींग प्रशिक्षण वर्ग सुरू केला. आज गेली 42 वर्षे हा गृहउद्योग सुरू आहे. हहूहळू याचा पसारा वाढत गेला. प्रशिक्षणाला येणार्‍या महिला, मुलींची वाढती संख्या पाहून रेखा मोरे यांनी अलिबागच्या ठिकरूळ नाक्यावर भाड्याच्या जागेत हा व्यववसाय सुरू केला. प्रशिक्षणाबरोबरच शिलाईचे काम वाढू लागले. कालांतराने भाड्याच्या जागेतून स्वतःच्या मालकीचे दुकाना घेतले. अलिबागमधील ठिकरूळनाका येथे दुकान सुरू आहे. तेव्हा प्रशिक्षित मुलींनाच काम देवून त्यांना अर्थप्राप्तीलचा मार्ग दाखवला. रेखा मोरे यांच्याकडे  प्रशिक्षण घेतलेल्यात अनेक मुलीनी, महिलांनी आपला स्वतंत्र व्यसवसाय सुरू केला. त्यांनी स्वतःची ओळख  निर्माण केली. काहीं जणींनी स्वतःचे क्लास सुरू केले आहेत. रेखा मोरे यांच्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्माण झाला. मागील 42 वर्षांमध्ये रेखा मोरे यांनी तीन पिढ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. त्यांना रोजगार उपलब्ध झाला. या माहिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम रेखा मोरे यांनी केले आहे.

शब्दांकन ः प्रकाश सोनवडेकर

……………………………………………………..    ………………………………………………

– राजश्री बोलके

काही कर्तृत्ववान महिला अशा आहेत की, ज्या प्रसिद्धीच्या झोतात नसतात. कार्य उल्लेखनीय असूनसुद्धा कसल्या प्रकारची अपेक्षा न करता अविरत सेवा करत असतात. आपलं कार्य हेच त्याचं ध्येय्य असतं. त्यातीलच एक म्हणजे राजश्री राजेंद्र बोलके. राजश्री बोलके यांच्या कार्याची सुरवात 2007 साली रिलायन्स टाऊनशिप येथून झाली. सुरवातीला त्या कामगारांच्या मुलांना अ‍ॅबॅकसच्या माध्यमातून शिकवू लागल्या. पुढे 2009 पासून त्यांनी नागोठणे ते पाली येथे क्लास सुरु केले. अ‍ॅबॅकस या प्रकारामध्ये सोप्या पद्धतीने गणिते सोडवली जातात. आतापर्यन्त अंतरराष्ट्रीय स्पर्धेत नागोठणे ते पाली येथील विद्यार्थांनी भरघोस बक्षीसे जिंकली आहेत. राजश्री बोलके यांच्याकडे धडे घेतलेले अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित झाले आहेत. कोरोना काळात सर्व काही बंद असताना राजश्री बोलके या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देत होत्या. लहान मुलांनी दिल्लीपर्यंत घेतलेली झेप पाहून कित्येक पालक बोलके यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ज्या प्रमाणे त्यांनी विद्यार्थी उच्चशिक्षित केले त्या प्रमाणे आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले आणि या सर्व गोष्टी करताना मोलाची साथ लाभली ती त्यांचे पती राजेंद्र बोलके यांची. आपल्या पतीच्या पाठिंब्यामुळे शिक्षण क्षेत्रात कार्य करताना एक ऊर्जा मिळत असल्याचे राजश्री या नेहमी म्हणत असतात.

शब्दांकन ः राज वैशंपायन

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply