– कल्पना हिलाल
विधवा आई आणि धाकटी बहिण असलेले आपले कुटुंब चालविण्यासाठी नेरळच्या मोहाचीवाडीमध्ये राहणार्या कल्पना पांडुरंग हिलाल यांनी आपले आयुष्य वेचले आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा, स्वतःचा आनंद यांना बाजूला ठेवत 20 वर्षे सिलेंडर प्रसंगी डोक्यावर वाहून नेले वडील पांडुरंग हिलाल यांचे 2002 मध्ये आकस्मिक निधन झाले, त्यावेळी कल्पना 20 वर्षाच्या होत्या. विधवा आई आणि एका बहिणीला कसे सांभाळायचे अशी चिंता कल्पना यांना सतावत होती. पुरेसे शिक्षण नाही, मग नोकरी कोणाकडे आणि कशी मागायची. त्यामुळे पडेल ते काम करण्याची हिंमत ठेवून कल्पना नेरळ गॅस सर्व्हिस येथे जाऊन तेथील व्यवस्थापकांना भेटल्या. मालकीणबाईंनी त्यांना घरोघरी गॅस सिलेंडर पोहचविण्याचे काम दिले. कोणतेही काम करताना लाज बाळगायची नाही, आचा निश्चय केलेल्या कल्पना हिलाल यांनी जुनी सायकल घेतली आणि त्यावर 17 किलो वजनाचा सिलेंडर ठेवून घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली. सायकलवरून सिलेंडर पोहोचण्याचे काम त्यांनी पाच वर्षे केले. त्यानंतर त्यांनी एक जुनी स्कुटर विकत घेतली. त्यामुळे घरपोच सिलेंडर पुरविण्याची क्षमता वाढली. त्या दिवसभरात 15-20सिलेंडर घरोघरी पोहच करू लागल्या. महिला असल्या तरी कल्पना तिसर्या मजल्यावर डोक्यावर सिलेंडर घेऊन जात असल्याने त्यांच्या या कामाचे कौतुक होऊ लागले. आपले हे काम अनेकांना समाधान मिळवून देत असल्याने त्यांनी मागे न पाहता आपल्या कामात 20 वर्षे खर्च केली आहेत. कल्पना हिलाल आता दिवसाला सुमारे 30 हुन अधिक घरी गॅस सिलेंडर पोहचवितात. शिवाय कोणत्याही वेळी फोन आला तरी कुठेही असलेल्या कल्पना हिलाल या अर्ध्या तासात गॅस भरलेली टाकी घेऊन पोहचतात. त्यांचे हे आगळेवेगळे काम समाजाला आदर्शवत आहे. वारकरी पंथाच्या हिलाल या आपल्या आईला घेऊन हरिनाम सप्ताहात सहभागी होतात.
शब्दांकन ः संतोष पेरणे
……………………………………………………… …………………………………………………
संध्या भडसावळे-देवस्थळे
स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांची कन्या असलेल्या संध्या देवस्थळे यांनी आपल्या समाजसेवेच्या आवडीतून असंख्य महिलांचे संसार उभे केले आहेत. एमएस्सीसारखे उच्चशिक्षण घेत वडिलांच्या छत्रात वाढलेल्या संध्याताई, पतीच्या आकस्मिक मृत्यूनंतर एकुलत्या एक डॉक्टर कन्येला संसाराला लावून आता गोरगरीब महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आघाडीवर आहेत. कोतवालवाडी ही संस्था आपला देश पारतंत्र्यात असताना उभी राहिली आणि त्या पवित्रभूमीत वास्तव्य करण्याची संधी लहानपणापासून संध्या यांना मिळाली. स्वातंत्र्यसैनिक असलेले आपले वडील कडक शिस्तीचे असल्याने जन्मजात देशसेवा आणि समाजहित यांचे बाळकडू त्यांना मिळाले होते. स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी कोतवालवाडी संस्था स्थापन करताना मूळ उद्देश नक्की केला होता आणि तो हेतू अजूनही पाळला जात आहे. आदिवासी समाज आणि गोरगरीबांना प्राधान्य देऊन त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम संध्याताई अविरतपणे करीत आहेत. कोतवालवाडीमध्ये म्हणजे गावापासून दूर राहून शिक्षण घेणारे संध्या आणि त्यांची भावंडे ही उच्चशिक्षण घेतलेली म्हणून आपला नावलौकिक मिळवून आहेत. नेरळ विद्या मंदिरमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेऊन नंतर मुंबईत वसतिगृहात राहून संध्या यांनी एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतले आहे. विवाहानंतर पुण्यात वास्तव्यास असतानादेखील संध्याताईंनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात भाग घेतला. तेथील अनेक संस्थांशी असलेले संबंध हे त्यांना आता कोतवाल ट्रस्टमध्ये काम करताना उपयोगी पडत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्यातील नामवंत मंडळींना कोतवालवाडीमध्ये आणून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून देण्याचा त्यांचा प्रयत्न समाजाप्रती सर्वस्व अर्पण केल्यासारखा आहे. समाज घडविण्याचे काम करीत असलेल्या संध्याताई यांची एकुलती एक कन्या डॉक्टर झाली आहे. पती वियोगानंतर संध्याताई देवस्थळे यांनी आपला संपूर्ण वेळ कोतवालवाडीसाठी समर्पित केला आहे. समाजातील अल्पशिक्षित तरुणांना रोजगारच्या संधी मिळाव्यात यासाठी या नवदुर्गेने एलअँडटी सोबतच्या करारात आयटीआयचे प्रमाणपत्र कोतवालवाडीमध्ये मिळवून देण्याचे केंद्र सुरू केले. ते केंद्र फारसे यशस्वी झाले नाही, तरीदेखील बांधकाम साईटवरील मेस्त्री आणि तत्सम कामगार निर्माण करण्याचे स्वप्न काही प्रमाणात तेथे यशस्वी झाले आहे. कोतवालवाडीमध्ये सर्व सोयी सुविधा असाव्यात यासाठी संध्याताई यांनी नक्षत्र बन उभे केले आहे. आपल्या वडिलांची आठवण कायम राहावी, यासाठी त्यांचे वास्तव्य राहिलेले घर ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन केले आहे आणि ते घर हेरिटेज ठेवून प्रेरणास्थान करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांना उद्योग व्यवसाय करता यावेत, यासाठी संध्याताईंनी कोतवालवाडी ट्रस्टमध्ये काही कोर्सेस सुरू केले आहेत. कोतवालवाडी ट्रस्टच्या महिला विभागात गेल्या आठ वर्षात नर्सिंग, टेलरिंग आदी प्रशिक्षण पूर्ण करून अनेक महिला आपले कुटुंब चालवीत आहेत. महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे महत्वाचे काम कोतवालवाडी ट्रस्ट करीत असून संध्या भडसावळे-देवस्थळे यांच्या या कार्याची नोंद समाजाने घेतली आहे.
शब्दांकन ः संतोष पेरणे