राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे सादर
मुंबई ः प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी (दि. 8) विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करीत ’पेन ड्राईव्ह’ बॉम्ब टाकला. सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचे सांगत फडणवीस यांनी हा पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केला. भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी षडयंत्र रचले होते. त्याला आमच्या पक्षातून सत्ताधारी पक्षात गेलेल्या एका नेत्यानेही मदत केल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. हे षडयंत्र कसे रचले जात होते याचे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला तसेच प्रत्येक व्हिडीओत कोण कोण संवाद साधत आहे हेही सांगितले. सरकारी वकिलाने कट कसा प्लांट करायचा, पुरावे कसे तयार करायचे, जबानी कशी नोंदवायची, साक्षीदाराने साक्ष काय द्यायची याची तयारी त्यांनी केल्याचेही फडणवीस यांनी विस्तृतपणे सांगितले. महाविकास आघाडीतील कारागृहात गेलेल्या नेत्यांबाबतही फडणवीस यांनी या वेळी खुलासा केला. माझ्याकडे सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग आहे. आता मी निवडक भाग देतो. यातील काही भाग सभागृहाची इभ्रत घालवणारे आहेत. ते सांगू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.
सरकारी वकील, पोलीस आणि मंत्र्यांचा सहभाग
ही कथा मोठी आहे. त्यावर 25 वेबसीरीज बनतील इतके मोठे मटेरियल आहे. त्याचा व्हिडीओ मी दिला आहे. सरकारी वकिलांचे कार्यालय हे विरोधकांविरोधातील षडयंत्र रचण्याची जागा आहे. चाकू प्लांट करण्यापासून गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जची रेड कशी करायची? हा असा गुन्हेगारी स्वरूपाचा कट वकील रचत आहेत. त्यात पोलीस आणि मंत्रीही आले. हे सर्व कुभांड रचले गेले. एफआयआरदेखील सरकारी वकिलांनी लिहून दिला. साक्षीदार सरकारी वकिलाने दिले. जबानी कशी नोंदवायची हे शिकवले. छापा कसा टाकायचा याची व्यवस्था केली. आमचे एक माजी नेते आता ते तुमच्या पक्षात आहे त्यांनी ही व्यवस्था केली. हॉटेल बुक केली. पैसे कसे द्यायचे हेही ठरले, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला.