गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील राजकारण आरोप-प्रत्यारोपांच्या शिमग्याने ढवळून निघाले आहे. राजकीय प्रगल्भता आणि सुसंस्कृतपणासाठी हा महाराष्ट्र एकेकाळी प्रसिद्ध होता, यावर आता कोणाचाही विश्वास बसणार नाही. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे, याचा विसर पडू देऊ नका, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी दिल्या होत्या. पण त्यांच्याच महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या नेत्याचे म्हणणे एका कानाने ऐकले आणि दुसर्या कानाने सोडून दिले, असेच म्हणावे लागेल.
गेले 28 महिने महाविकास आघाडीचे सरकार कसेबसे तग धरून आहे. त्यांचे दोन महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री निरनिराळ्या प्रकरणांमध्ये गजाआड आहेत आणि एकूण 14 जणांवर विविध तपासयंत्रणांची नजर आहे. त्यांच्या चौकशा सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांच्या भडिमारापुढे सत्ताधारी आघाडीतील नेते अक्षरश: घायाळ झाले आहेत. सोमय्या हे कधीच हवेतले आरोप करीत नाहीत. पुराव्याचे कागद हातात फडकवूनच ते बोलतात आणि सक्षम तपासयंत्रणांकडे रितसर तक्रारही गुदरतात. इतकेच नव्हे तर तक्रार गुदरल्यानंतर त्याचा फॉलोअपदेखील चिकाटीने घेतात. हे तर महाविकास आघाडीतील नेत्यांनाही मान्य असावे. शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आणखी एक पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांच्यावर वारेमाप आरोप केले. तेव्हादेखील सोमय्या हे वारंवार तक्रारी दाखल करणारे सीरियल कम्प्लेनर आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. खरे तर सीरियल कम्प्लेनर ही सोमय्या यांच्यासाठी एक प्रकारे कॉम्प्लिमेंटच ठरावी. अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीतील काही अधिकार्यांचे खंडणीखोरीचे रॅकेट असून, भाजपचे एटीएम असल्यासारखी ही तपासयंत्रणा वागते, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. राऊत यांनी केलेले आरोप सोमय्या यांनी ताबडतोब प्रत्युत्तर देत बिनबुडाचे ठरवले. कारण सोमय्या यांच्याप्रमाणे राऊत यांना पुरेशी कागदपत्रे दाखवता आली नाहीत. तुम्ही आमच्या अंगावर आलात, तर आम्हीही तुमच्या अंगावर येऊ एवढाच मर्यादित संदेश राऊत यांच्या पत्रकार परिषदेतून मिळाला. तपासयंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही आक्रमक धोरण स्वीकारले असले तरी त्यात फारसा दम नाही. विरोधीपक्षातील नेत्यांवर खोट्या केसेस टाकण्यात येत असल्याचे तसेच त्यासाठी अनेकांकडून खोटे जबाब नोंदवण्यात आल्याचा गौप्यस्फोट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधिमंडळ सभागृहातच केला. सरकारी वकील आणि पोलीस अधिकार्यांकडून विरोधीपक्षाच्या नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी षड्यंत्र रचण्यात येत असल्याचे पुरावे त्यांनी सभागृहासमोर ठेवले. आपण केलेले आरोप सिद्ध झाल्यास महाविकास आघाडीची इभ्रत तर जाईलच पण सभागृहाची विडंबनाही होईल, असेही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या या वक्तव्यात फार मोठे तथ्य आहे. विधानसभा अध्यक्षांना फडणवीस यांनी एक पेनड्राइव्ह भरून पुरावे सुपूर्द केले आहेत. तब्बल 20 ते 25 वेबसीरीज निर्माण होऊ शकतील, एवढा नाट्यपूर्ण असा डेटा त्यात आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. फडणवीस यांनी टाकलेला आरोपांचा हा बॉम्ब महाविकास आघाडीत चांगलाच मोठा धमाका करणार यात शंका नाही. दहा मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेल, अशी भाकिते मध्यंतरी करण्यात आली होती. त्या कोसळण्याची ही सुरुवात तर नाही ना अशी चर्चा या राजकीय शिमग्यात रंगू लागली आहे.