Breaking News

आंब्यांना विदेशात मागणी वाढली ; नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या हापूसवर ग्राहकांच्या उड्या

नवी मुंबई : बातमीदार

सध्या केमिकलयुक्त भाज्या, धान्य व फळे पिकवण्याची चढाओढ लागलेली सर्वत्र पाहायला मिळते. कमी पैशात घातक रसायने वापरून पिकवलेली फळे सर्रास बाजारात मिळतात. अस्सल खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आंब्याची देखील त्यातून सुटका झालेली नाही. अशा घातक रासायनांनी पिकवण्यात येणार्‍या फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, मात्र सध्या एपीएमसी मार्केटमध्ये नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्यांना वाढती मागणी सर्वांचेच लक्ष वेधून घेऊ लागली आहे. आंबा पिकवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या शासनमान्य इथिलन रसायनाचा देखील वापर न करता आंबा पिकवला जात आहे. सध्या आपल्या आरोग्यप्रती भलतीच सावधता बाळगणार्‍या नागरिकांकडून या आंब्याची मागणी वाढू लागली आहे.

फळांचा राजा हापूस. हा हापूस अस्सल खवय्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला आहे. कधी एकदा मार्च, एप्रिल महिना उजाडतो नि आंब्याची सुमधुर चव जिभेवर रेंगाळते अशी वाट ग्राहक बघत असतात, मात्र भारतात ज्या गोष्टीला जास्त मागणी त्यात भेसळ आलीच अशी स्थिती पाहायला मिळते. त्यामुळेच की काय आंब्यासारख्या फळावर देखील असेच धोकादायक केमिकल वापरून ते पिकवले जात आहेत. त्यात आंब्यांचा राजा हापूस आंबा म्हटलं की सिंधुदुर्ग, रत्नागिरी म्हणजेच कोकण हे समीकरण जुळलेलेच, मात्र त्यात देवगड व रत्नागिरीचा हापूस जगप्रसिद्ध आहे. त्यात इतर राज्यांची घुसखोरी झालेली असून खुशाल कर्नाटक, केरळ, तमिळनाडूतील दुय्यम प्रजातीचे हापूस आंबे अव्वल दर्जाचे कोकणातील असल्याचे भासवून विकले जात आहेत. त्यात धोकादायक केमिकलचा अमाप मारा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, मात्र यावर वाशी एपीएमसीतील व्यापार्‍यांनी मात केली आहे. आंबा पिकवताना शासनाने मान्यता दिल्याप्रमाणे इथिनीलचा वापर केला जातो, मात्र सध्या वाढत्या भेसळीमुळे ग्राहक नैसर्गिक पिकवलेल्या भाज्या, धान्य व फळांकडे वळू लागले आहेत. आरोग्याची काळजी घेणार्‍यांची त्यासाठी कितीही किंमत मोजण्याची तयारी असते. सध्या कोकणातून कच्चा हापूस आंबा मार्केटमध्ये आल्यावर पिकवण्यासाठी इतर फळांचा वापर केला जात आहे. या फळांमधून आंब्याला इथिलन मिळून पिकण्याजोगे वातावरण तयार होऊन आंबा नैसर्गिकरीत्या पिकवला जात आहे.

-चिनी इथिलीन

पुडीमधील चिनी इथिलीन रसायन असले, तरी यात एक अंशही घातक घटक नसल्याचे समोर आले आहे. इथिलीनची फवारणी फळांवर केली जायची मात्र आता बंद पुडी पाण्यात भिजवून ती पेटीत ठेवून टवटवीत फळ बाहेर येऊ लागले आहे. त्यामुळे सोप्या व कमी खर्चिक उपायावर व्यापारी खूश असून ग्राहकांना देखील रसायन विरहित फळ मिळू लागले आहे, मात्र तरीही नागरिक नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्याची विचारणा करू लागले आहेत.

-ऑनलाईन खरेदीला वाढती मागणी सध्या आंबे नैसर्गिकरीत्या पिकवण्यात व्यापार्‍यांची दुसरी पिढी बाजारात उतरलेली आहे. त्यांच्या नवनव्या कल्पनांमुळे वाशीतील नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा जगभरात पोहोचला आहे. विदेशात आंबा पाठवण्यासाठी त्या त्या देशातील कायदे व नियमांनुसार आंबा पिकवण्यात येत आहे. त्यामुळे वाशीतील रसायनविरहित पिकलेल्या आंब्याला मागणी वाढू लागली आहे. त्यात नव्या पिढीने सोशल मीडियाचा उत्तम वापर करत ऑनलाईन आंबे विकण्यास व घरपोच पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात व कडक उन्हात बाहेर पडण्याचा त्रास न घेणार्‍या नागरिकांच्या या ऑनलाईन नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्याच्या खरेदीवर उड्या पडू लागल्या आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply