नियमित पाणीपुरवठा व ड्रेनेज लाइनच्या कामासाठी निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे शहरात होणार्या अनियमित पाणीपुरवठा तसेच रस्त्यावर वाहणार्या तुंबलेल्या ड्रेनेज लाइनचे ऑडिट करून सुधारणा करण्याबाबत मंगळवारी (दि. 15) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने कामोठे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची सही केलेले निवेदन देण्यात आले. याबाबत त्वरीत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी समाजसेवक प्रदीप भगत, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले , चिटणीस प्रवीण कोरडे, सागर ठाकरे हे उपस्थित होते.
कामोठे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी कामोठे शहरातील नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा परिस्थिती सुधरत नाही, तसेच आपण केलेल्या ऑडिट संदर्भांत कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. सिडको पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष निार्मण झाला आहे. यासाठी केलेल्या ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला मिळावा आणि त्यावर लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करून नागरिकांना भेडसावणार्या प्रश्नातून मुक्तता करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
तसेच कामोठे शहरात असलेल्या ड्रेनेज लाइनमधील तुंबलेले सांडपाणी हे रस्त्यावर वाहत असते. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालताना सांडपाण्याची दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे आणि रस्त्यावर चालणार्या गाड्यांमुळे ते सांडपाणी हे रहदारी करणार्या नागरिकांच्या अंगावर उडते. याबाबतही ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
…तर जनआंदोलन उभारू
या संदर्भात अपेक्षित कार्यवाही केली नाही, तर 17 मार्च या सिडको स्थापना दिनीच सिडको प्रशासनाविरोधात मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.