Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेकापची कोंडी

आगामी काळात रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्हा परिषद आपल्या हातात असावी, यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत आहेत. सध्या जिल्ह्यात कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्ता काबिज करू शकत नाही, अशी राजकीय स्थिती असताना जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमत नाही असे दिसून येत आहे.

शेकापची शिवसेनेसोबत वाढत चाललेली गट्टी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपला सत्ताधारी मित्र शेकाप हा जिल्ह्यात शिवसेनेच्या जवळ जाणार नाही, याची काळजी घेताना दिसत होता. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री कर्जत तालुक्यात आल्या. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व विकासकामांचा निधी आपल्याच पक्षाच्या माध्यमातून आला आहे असे भासवत निमंत्रण पत्रिका बनवली आणि त्यातून शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार केले. त्यात कर्जत विधानसभा मतदारसंघात शेकापकडून शिवसेनेसोबत छुपी चर्चा केली जात असल्याचे सातत्याने बोलले जाते. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँगे्रस करताना दिसत आहे.

पाच वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता काबिज केली. त्यानंतर सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि 2019मध्ये विधानसभा निवडणूक लढवीत विधानसभेत प्रवेश केला. मात्र त्याच विधानसभा निवडणुकीत शेकापला विद्यमान दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला आणि त्या वेळी शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दरी निर्माण झाली. जिल्हा परिषदेची सत्ता विरोधकांच्या हाती देऊन जमणार नाही म्हणून शेकाप-राष्ट्रवादी एकत्र आले, पण विषय समित्यांवरून राष्ट्रवादी आणि शेकापमधील धुसफूस सर्वांनी पाहिली आहे. आता मागील वर्षभर शेकाप जिल्ह्यातील काही तालुक्यात शिवसेनेसोबत जवळीक साधत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसची मनधरणी आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निमित्ताने मान्य केली आणि कर्जतमधील एका रिसॉर्टवर शेकाप-राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते एकत्र आले. पण शेकाप जिल्ह्यात शिवसेनेसोबत जाऊ शकतो अशी भीती पुन्हा निर्माण झाली आहे.

रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकापचे 21 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 सदस्य असून सदस्य मंडळात सत्तेत या दोन्ही पक्षांचा समान वाटा आहे. त्यामुळे कोणत्याही विकासकामांची उद्घाटनेही दोन्ही पक्ष एकत्रित येऊन करीत असतात. मात्र 20 मार्च रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकासकामांचा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केला. त्यासाठी तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेवर ‘सबकुछ राष्ट्रवादी काँग्रेस’ अशी  परिस्थिती आहे.

या पत्रिकेत शेतकरी कामगार पक्षाच्या या तालुक्यातील पदाधिकारी तसेच दोन्ही जिल्हा परिषद सदस्यांच्या नावाचा उल्लेख देखील नाही. त्यामुळे ही जंत्री रायगड जिल्ह्यातील आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीमध्ये अडथळा ठरू शकते. कर्जत तालुक्यातील बीड बुद्रुक, पाथरज, खांडस, सावेळे, नेरळ आणि उमरोली या सहापैकी केवळ जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. तर शेकापचे दोन सदस्य आहेत. या सर्व प्रभागात विकासकामांची भूमिपूजने केली जात असताना त्या कार्यक्रमाला अन्य पक्षातील कोणत्याही सदस्याचे नाव निमंत्रण पत्रिकेत नाहीत. त्यामुळे ते सर्व कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शेकापला कर्जत तालुक्यातील विकास कामांच्या जंबो सोहळ्याला साधे निमंत्रण नाही. शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या या जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहिलेल्या आघाडीमधील घटक पक्ष नव्हता. मात्र जे दोन पक्ष राष्ट्रवादीची सदस्य संख्या कमी असून पाच वर्षे सत्तेचा संसार करून तो पूर्णत्वाला नेला गेला आहे अशा आघाडीमधील अन्य दोन पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस जाणीवपूर्वक लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे काय? याबद्दल देखील दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.

शेकाप जिल्हा परिषदेमधील क्रमांक एकचा पक्ष असून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 20 मार्च रोजी मुदत संपत असलेल्या जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी शेकापला दूर ठेवत आहे. याचा बोध राजकीय वर्तुळात महत्त्वाचा समजला जात आहे. कारण पाच वर्षे या दोन्ही सत्ताधार्‍यांनी सत्ता राबविली पण पाच वर्षांचा शेवट असलेल्या 20 मार्च या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेकापला दूर ठेवण्याची भूमिका जाणीवपूर्वक की नजरचुकीने झाली? याचे उत्तर नजीकच्या काळात मिळणार आहे. मात्र नेरळ-ममदापुर संकुलामध्ये विकासकामे करताना ती नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून झाली की, शेतकरी कामगार पक्षाच्या कोट्यातून अशी चर्चा त्या त्या कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात झाली आहे. त्यामुळे नेरळ प्राधिकरणावर आगामी काळात वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धडपड सुरू आहे की, आपल्या मित्राला शेकापला डिवचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

या विकासकामांची उद्घाटने आणि भूमिपूजने रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे, जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांच्या उपस्थितीत झाल्याने जिल्ह्यात आगामी काळात शेकाप दूर ठेवण्याची रणनिती तर बनविली गेली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांना राज्यात तीन पक्षांच्या आघाडीची सत्ता कायम राहावी असे वाटत आहे. खालापूर नगरपंचायतीमध्येही शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत थेट उपनगराध्यक्ष पद देऊन जिल्ह्यात कोणत्याही पक्षाची आघाडी-युती होऊ शकते असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्य मंडळाची मुदत संपत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याला शेकापच्या नेत्यांना आणि सदस्यांना मुद्दाम डावलले असे बोलले जात आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष देखील एकत्र आल्यास नवल वाटायला नको.

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची ताकद लक्षात घेता शेकापशिवाय किमान रायगड जिल्हा परिषदेमध्ये तरी सत्ता मिळविणे शक्य नाही अशी राजकीय स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेकापला जाणीवपूर्वक डावलले की, शेकापला खिजवण्याचा प्रयत्न करीत आहे हे येणारा काळ ठरविणार आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि शेकाप यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याने राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग रायगड जिल्ह्यात राबविला जाणार नाही ना? अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु राष्ट्रवादी स्वतः आक्रमकपणे भूमिका घेऊन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत असेल तर शेकापची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अशी भूमिका घेतली आहे का? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply