पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या मुख्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेला रंगी-बेरंगी मासा तेथे येणार्यांचे लक्ष वेधून घेतो तसेच छत्रपती शिवाजी चौकातील स्वच्छतादूतांच्या प्रतिकृती किंवा पोदीवरील पिल्लेज कॉलेजजवळ टायरपासून बनवलेले पक्षी पनवेल शहराच्या सौंदर्यात भर तर घालतातच, शिवाय टाकाऊ कचर्यापासूनसुद्धा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेशही नागरिकांना देत आहेत.
आज प्रत्येक महानगरात कचर्याचा प्रश्न बिकट होत आहे. अनेक टाकाऊ वस्तू नागरिक रस्त्यावर टाकून शहराचे सौंदर्य बिघडवत असतात. पनवेल महापालिकेने महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून त्या शहरातील मुख्य चौकात लावून शहर सजवले आहे. त्यासाठी पनवेल महापालिकेने ’माझी वसुंधरा’ व ’स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा घेतली होती. महापालिका कार्यक्षेत्रातील नऊ ते सत्तर वर्षांपर्यंतच्या अबालवृद्धांनी व सोसायट्यांनी रोजच्या घरातील टाकाऊ वस्तूंपासून सजावटीच्या तसेच उपयोगी वस्तू तयार केल्या. यामध्ये कागदापासूनच्या दुचाकी, चारचाकी गाड्या, बाहुल्या, फुले, तेलाच्या रिकाम्या डब्यांपासून फुलांच्या कुंड्या, निरूपोयगी टायरपासून बसण्याच्या खुर्च्या, जुन्या काचेच्या बाटल्यांपासून लॅम्प, फ्लॉवर पॉटस्, सुतळ्यांपासून शोच्या वस्तू, जुन्या कापडापासून पायपुसण्या अशा अनेक वस्तू तयार केल्या.
महापालिकेने त्या वेळी जाहीर केल्याप्रमाणे त्यातील निवडक वस्तू शहरातील विविध चौकांत बसविल्यामुळे शहराचे सौंदर्य तर वाढलेच, शिवाय नागरिकांनाही टाकाऊ कचर्यापासूनसुद्धा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते हा उत्तम संदेश मिळाला आहे. सुक्या कचर्याची स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावणे शक्य असल्याचेदेखील यामुळे नागरिकांना समजू शकणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रेरणा -महापौर कविता चौतमोल
वाराणसी येथे झालेल्या महापौर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला एक टास्क दिला होता की तुमच्या महापालिका हद्दीतील सर्व नागरिकांचा समावेश होईल व ते भाग घेतील अशी स्पर्धा घ्या. त्याप्रमाणे आम्ही नगरसेवक, आयुक्त आणि उपायुक्त यांनी चर्चा करून टाकाऊ कचर्यापासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा घेतली. या स्पर्धेत 90पेक्षा जास्त जणांनी भाग घेतला. यामध्ये तयार करण्यात आलेल्या वस्तू आम्ही शहरातील मुख्य ठिकाणी बसवल्या आहेत. ही संकल्पना आवडल्याचे अनेकांना सांगितले. पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यास महापालिका हद्दीत सगळीकडे अशा वस्तू बसवणार आहोत, असे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper