पनवेल : वार्ताहर
गतिरोधकांच्या दूरवस्थेमुळे वाहनांची नासधूस होत असल्याचे प्रकार तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील प्रवासादरम्यान अनुभवायला मिळत आहे. मुख्य रस्त्यावरील गतिरोधक वेळीच दुरूस्त न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वाहनचालकांकडून वर्तविली जात आहे. याबाबत तळोजा वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तळोजा कार्यालयाला चार पत्र पाठविले आहे, मात्र वाहतूक पोलिसांच्या पत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून केराची टोपली दाखविली आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये अनेक कारखाने आहेत. त्यामध्ये रासायनिक इलेक्ट्रिकल, फिशर व इतर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये माल उतरवण्यासाठी तसेच घेऊन जाण्याकरता मोठ्या संख्येने अवजड वाहने येतात. त्याचबरोबर एमआयडीच्या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून गतिरोधक उभारण्यात आले आहेत, मात्र येथील सर्व गतिरोधकांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याबाबत तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी औद्योगिक विकास महामंडळाला एमआयडीसी हद्दीतील मुख्य रस्त्यावरील दुरवस्था झालेले गतिरोधकांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आतापर्यंत चार पत्रे पाठविली आहेत, मात्र वाहतूक पोलिसांच्या पत्रांना केराची टोपली दाखविली आहे. या नादुरुस्त गतिरोधकांमुळे या रस्त्यावर अपघात होण्याची दात शक्यता असल्याने लवकरात लवकर गतिरोधकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
रस्त्यावरील अपघातांना निमंत्रण
तळोजा एमआयडीसी येथील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच रात्रीच्या सुमारास रामकिशन चौक या ठिकाणी दुचाकीस्वार सुरेश पवार हे बेलनाका ते नावडा फाटा येत असताना गतिरोधक अर्धवस्थेत तुटलेले असल्याने त्याचबरोबर पांढरे पट्टे नसल्याने त्यांची दुचाकी घसरली व अपघात होऊन त्यात ते जखमी झाले. असे अनेक अपघात घडले आहेत.
तळोजा एमआयडीसी येथील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांची दुरवस्था झालेली आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.
-दीपक बोबडे, डेप्युटी इंजिनिअर, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ