भातशेती नुकसानीची पालकमंत्र्यांसह पाहणी
पनवेल ः प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याची शनिवारी (दि. 2) पाहणी केली. त्यांनी शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी संबंधित अधिकार्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. बांधनवाडी व अन्य परिसरातील शेतीची या वेळी अधिकार्यांसह पाहणी करण्यात आली.
अवकाळी पाऊस, क्यार वादळामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी यात उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तालुक्यातील शेतीची नुकसानभरपाई तातडीने द्यावी, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी तालुक्यातील संबंधित अधिकार्यांनी केली.
या वेळी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, भूपेंद्र पाटील, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, शेतकरी, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.