पेण : प्रतिनिधी – येथील ट्री हाऊस स्कूल तर्फे ज्ञानवर्धक नेचर डेटिंग एज्युकेशन ट्रीप नुकतीच तारा (ता. पनवेल) येथील गो ग्रीन नर्सरी येथे काढण्यात आली होती. तेथे विद्यार्थ्यांना वृक्षांचे फायदे व पर्यावरणाचे संतुलन याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व निरनिराळ्या वेलींचा परिचय करून देण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या ट्रीपमध्ये शाळेच्या गीता टीचर, आरती टीचर यांच्यासह गो ग्रीन नर्सरीतील व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीबद्दल माहिती देऊन वृक्षांचे संगोपन कसे करावे, हे समजावून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यासोबत वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर जवळच असलेल्या युसुफ मेहरअली सेंटरमध्ये सोप मेकिंग, पॉट मेकिंग, ऑईल मेकिंग याबाबतची सविस्तर प्रात्याक्षिके विद्यार्थ्याना दाखविण्यात आली. शेवटी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गो ग्रीनचा निरोप घेतला.