निर्देशांचे पालन न झाल्यास आंदोलन : सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल आणि तळोजा या सिडको वसाहतींमध्ये होणार्या अपुर्या व अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात बुधवारी (दि. 23) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. बेलापूर येथील सिडको भवनामध्ये झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून शिंदे यांनी पाण्याची समस्या दूर करण्यासंदर्भातील निर्देश दिलेे. दरम्यान, या निर्देशांचे पालन झाले नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमध्ये राहणार्या नागरिकांना अनेक वर्षांपासून पाण्याच्या तुटवड्याची समस्या भेडसावत आहेत. नुकतेच खारघर येथे पाण्याच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी सिडको अधिकार्यांना घेराव घातला होता. त्या वेळी अधिकार्यांनी बुधवारी या समस्येवर सिडको भवनामध्ये बैठक घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सहव्यवस्थापक कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीला पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, निलेश बावीस्कर, बबन मुकादम, प्रवीण पाटील, नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, भाजप नेते किर्ती नवघरे, अमर उपाध्याय, समीर कदम, वासुदेव पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी खारघर आणि कामोठ्यामध्ये जाणवणारा पाण्याचा तुटवडा एमजेपी आणि एमआयडीसीच्या माध्यमातून पूर्ण व्हावा तसेच कळंबोली आणि नवीन पनवेलमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन व्हावे असे निर्देश दिले तसेच पाण्याची चोरी आणि टँकरबाबत असलेल्या समस्या दूर करण्यासंदर्भातही त्यांनी निर्देश दिले.
या बैठकीसंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठ्याबाबत जे निर्देश दिले त्यांची अंमलबजावणी होते की नाही याची आम्ही पाहणी करणार आहोत. जर या निर्देशांचे पालन होताना दिसले नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.