कर्जत : बातमीदार
तालुक्यातील नेरळ रेल्वे स्थानकामधील वायफाय सेवा बंद आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली वायफाय सेवेचे संच स्थानकात अस्ताव्यस्त अवस्थेत पडून आहेत.त्यामुळे नेरळ रेल्वे स्थानकातून प्रवास करणार्यांना वायफाय सेवेपासून वंचित राहावे
लागत आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ जंक्शन हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. याच स्थानकातून माथेरानला मिनीट्रेन जात असते. मध्य रेल्वेने तीन वर्षापूर्वी नेरळ रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी वायफाय सेवा सुरु केली होती. या सुविधेचा फायदा प्रवाशांना होत होता, मात्र कोरोना सुरु झाला आणि रेल्वे स्थानकात असलेल्या वायफाय सेवेचा प्रवाशांकडून वापर बंद झाला. त्यानंतर वायफाय सेवा बंद असून, वायफाय संच पडून आहेत.
वायफाय सेवा बंद असल्याने नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांच्यासह मिलिंद विरले, राजेश गायकवाड, प्रभाकर देशमुख व अन्य पदाधिकार्यांनी नेरळ स्थानकातील वायफाय सेवा पुर्ववत सुरु करावी, अशी मागणी मुंबई मंडळाच्या महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.