Breaking News

बेफिकीरी नकोच

केंद्र सरकारने महामारीसंबंधीचे निर्बंध मागे घेत असल्याचे म्हटले हा सोयीचा भाग तेवढा लोकांनी उचलून धरला आहे. खबरदारी कायम ठेवण्याबाबत केंद्राने केलेली सूचना मात्र बहुतेकांनी दुर्लक्षित केली आहे. ही अशी बेफिकीरी आपल्याला परवडणार आहे का? जगभरातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन आणि बीए.2 हे दोन विषाणू धुमाकूळ घालत आहेत या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

देशात कोरोनाची महासाथ सुरू होऊन अवघे जगणे ठप्प होण्याला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. पण अलीकडच्या काळात देशभरात आणि राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमालीची खाली आल्याने साथीसंबंधीचे निर्बंध पूर्णत: उठवण्याची चर्चा सुरू झाली. पाठोपाठच, साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दोन वर्षांपूर्वी घातलेले सारे निर्बंध 31 मार्चपासून मागे घेण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. ही घोषणा करतानाच, मास्क लावणे आणि वारंवार हातांची स्वच्छता राखणे ही खबरदारी मात्र घ्यावीच लागेल हेही केंद्र सरकारने स्पष्ट केले. परंतु सर्वसामान्य जनतेची मानसिकता तर महामारी संपली अशीच झाली आहे. धुळवडीच्या दिवशी अनेकांनी मास्कला सुट्टी दिली आणि तेव्हापासून शक्य असेल तिथे मंडळी मास्कविना वावरण्याची सवलत बिनदिक्कत घेऊ लागली आहेत. सामाजिक अंतर राखणे असे काही आपण अगदी अलीकडेपर्यंत पाळत होतो याचाही एव्हाना कित्येकांना पुरता विसर पडला आहे. जिथे खुर्च्यांवर स्टिकर चिकटवून बसण्यास मनाई केली जाते,तिथे तेवढे आता सामाजिक अंतर राखले जाताना दिसते. बाकी सर्वदूर जगणे पूर्ववत झाले आहे. लोकांनी हे असे वागणे स्वाभाविकही आहे. कोरोनापूर्व जगणे अनुभवण्याची ओढ सर्वांनाच वाटते आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा गाडा सुरळीत व्हावयाचा असेल तर जगणे पूर्ववत होण्याला पर्यायही नाही आणि देशाची पावले त्या दिशेनेच पडत आहेत. पण ते करत असतानाच चीन, अमेरिका आणि अन्य काही दक्षिण आशियाई देशांमधली वाढती कोरोना रुग्णसंख्या दुर्लक्षित करून चालणार नाही. या देशांमध्ये कोविड केसेसनी शिखर गाठलेले असताना आपल्याकडे साथ ओसरलेली पाहायला मिळते आणि या देशांमध्ये रुग्णसंख्या घसरू लागल्यावर आपल्याकडे साथ फैलावताना दिसते हे आपण गेल्या दोन वर्षांच्या काळात अनुभवलेले आहे. येत्या जून महिन्यात कदाचित भारताला कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेचा फटका बसेल असा अंदाज आयआयटी कानपूरने एका अभ्यासाअंती व्यक्त केला आहे. तूर्तास आपल्याकडील कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या खाली गेेली असली तरी बीए.2 हा या विषाणूचा नवा अवतार हळूहळू भारतात पाय पसरतो आहे हेही तपासण्यांतून समोर आले आहे. देशात लसीकरण बर्‍यापैकी झालेले असल्याने एखादा नवा विषाणू आल्याशिवाय आपल्याकडे मोठी रुग्णवाढ पाहायला मिळणार नाही असे मतही काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यापूर्वीच्या तीन लाटांमध्ये आपल्या आरोग्यव्यवस्थेच्या क्षमतेत चांगली सुधारणा झाली ही देखील एक जमेची बाजू आहेच. त्यामुळेच केंद्र सरकारने निर्बंध हटवण्याचे पाऊल उचलले आहे. परंतु सोबतच सरकारने केलेले खबरदारी कायम राखण्याचे आवाहन दुर्लक्षित करता येणार नाही. अद्याप लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. बूस्टर डोसही अनेकांना मिळायचा आहे. अशात बेफिकीरीमुळे चौथ्या लाटेला तोंड द्यावे लागले तर बसणारा आर्थिक फटका आपल्याला अजिबातच परवडणार नाही हे लक्षात ठेवायला हवे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply