अलिबाग : प्रतिनिधी
सद्या सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत. सुक्या मासळीच्या विक्रीतून यंदा करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या रायगड जिल्ह्यातील किनार्यांवर सध्या मासळी सुकवण्याची लगबग पहायला मिळत आहे. अलिबाग, मुरूड, उरण आणि श्रीवर्धनच्या समुद्र किनार्यावरील कोळीवाड्यात मासळी सुकवण्यास टाकल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकूल आणि आंबाड या माशांची आवक वाढली आहे. ओल्या मासळीला चांगला दर मिळत नसल्याने मच्छी सुकविण्यावर कोळी महिलांनी भर दिला आहे. सुक्या मासळीला राज्यभरातून तसेच आसपासच्या राज्यातून मोठी मागणी असते. त्यामुळे दरही चांगला मिळतो आहे.
वाकट्या 500 ते 600 रुपये किलो, आंबाड 400 ते 500 रुपये किलो, मांदेली 300 रुपये किलो, माकले 400 ते 600 रुपये किलो, सुके बोंबील 400 ते 500 रुपये किलो, कोळंबीचे सोडे 1500 ते 1800 रुपये किलो असा सध्याचा दर आहे. यावर्षी मासळीची आवक चांगली असल्याने सुक्या मासळीतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा मच्छीमार आणि कोळी बांधवांना आहे.
दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल
अलिबाग तालुक्यातील थळ, नवगाव, वरसोली ही गावे सुक्या मासळीसाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणची सुकी मच्छी राज्यातील विवीध भागात विक्रीसाठी पाठवली जात असते. याशिवाय कोकणात होणार्या यात्रा उत्सवांमधूनही सुक्या मासळीची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …