नवी मुंबई : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळात परप्रांतीय मजुरांना आपल्या मूळगावी जाण्याची परवानगी काही अटीवर शासनाने दिली. परंतु गावी जाताना परवानगी घेण्यासाठी लागणारे अर्ज चढ्या भावाने विकले जात असल्याने परप्रांतीय मजुरांची लूट नवी मुंबई परिसरात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही लूट खुद्द परप्रांतीयच करताना दिसत आहेत. तसेच हे अर्ज विकत घेताना कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे भान ठेवले जात नसल्याने पोलिसांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
अस्थायी मजूर मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील विविध शहरात कामासाठी आले आहेत. ते मजूर पावसाळा संपला की, शहरात येतात व पावसाळ्यापूर्वी आपल्या गावी प्रयाण करतात. या वर्षी सुद्धा ते गावाच्या तयारीत असताना नेमकाच कोरोना महामारीची लागण झाली. त्यामुळे लॉकडाऊनसारखा हत्यार शासनाला उगरावा लागल्याने त्या मजुरांना आपल्या गावी जाता आले नाही. त्यामुळे मजुरामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता. तो असंतोष काही दिवसापूर्वी बांद्रा येथे दिसून आला होता.
शेवटी शासनाने परप्रांतीय मजुरांना जाण्यासाठी हिरवा कंदील काही शर्तीवर दिला. त्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस पोलीस प्रशासनाची परवानगी अत्यावश्यक करण्यात आले. त्यासाठी प्रशासनाने अर्ज भरून मागितले आहेत. त्यासाठी परप्रांतीय नागरिक अर्जासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील करत आहेत. ज्या अर्जाच्या झेरॉक्सची किंमत दोन रुपये आहे. ती झेरॉक्स 40 ते 50 रुपयाला मजूर विकत घेत आहेत. त्यामुळे परप्रांतीय मजुरांना लुटले जात
असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे.
अर्ज विकण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गर्दी नवी मुंबई मधील विविध ठिकाणी दिसून येत आहे. तसेच गरीब मजुरांची लूट केली जात आहे. यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. नाहीतर कोरोनाचे राज्य येईल.
– गोविंद साळुंखे, नागरिक, नवी मुंबई