Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून अधिवेशनात पुन्हा ‘दिबां’च्या नावाचा गजर

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त

आयुष्याच्या शेवटपर्यंत भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमूर्ती लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तर शंभर प्रकल्पांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, पण नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त ‘दिबा’साहेबांचे नाव पाहिजे, अशी जोरदार मागणी आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आठवडा प्रस्तावावर बोलताना सभागृहात केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी ‘दिबा’साहेबांच्या कारकिर्दीचा आलेख सभागृहात मांडतानाच ‘दिबा’साहेबांचेच नाव का हवे या संदर्भात भूमिपुत्रांची विस्तृत भूमिका मांडत विधानसभेत पुन्हा ‘दिबां’च्या नावाचा गजर केला. सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोच्या माध्यमातून निर्माण केले जात आहे. हे विमानतळ बनवणारी सिडको मुळामध्ये 1970 साली नवी मुंबईच्या निर्मितीसाठी या ठिकाणी आली. 1970 सालच्या संपादनामध्ये ठाणे, रायगड जिल्ह्यातील संपूर्ण 95 गावांचे गावठाण संपादित केले जाणार होते. त्या 95 गावांचे गावठाणांसह स्थलांतर करण्याची योजना होती. त्या वेळी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब स्थानिकांच्या बाजूने उभे राहिले. ते पाच वेळा विधानसभेचे आमदार, दोन वेळा खासदार, एक वेळा विधान परिषदेचे आमदार, 1972 ते 1977पर्यंत या सदनाचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र शेतकरी सभेचे अध्यक्ष होते. त्यांनी सीमाप्रश्नी एक वर्षाचा कारावास भोगला. 1984 साली जासई येथे आंदोलन पेटले त्या पनवेल आणि उरण जमीन बचाव समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. देदीप्यमान कारकीर्द असलेले ‘दिबा’साहेबांचे कार्य या सदनाला माहीत आहे. त्यामुळे वेगळे सांगण्याची गरज नाही. 1984 साली शेतकर्‍यांचे आंदोलन दाबून टाकण्यासाठी गोळीबार झाला. दोन दिवसांत पाच शेतकरी हुतात्मे झाले. ‘दिबा’साहेबांनी आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी लढा दिला, त्या शेतकर्‍यांनी वीट वीट जोडून त्यांना घर बांधून दिले आणि त्या घराचे नाव संग्राम आहे. या घरामध्ये देवाचे फोटो नाहीत, तर पाच हुतात्म्यांचे फोटो लावलेले आहेत. शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर ते लढले. ज्या भूमीवर हा लढा लढला ती जमीन सिडकोने जेएनपीटीला देऊ केली. त्या जेएनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांना आजही साडेबारा टक्के भूखंड मिळाले नाहीत. ‘दिबा’साहेबांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत रुग्णवाहिकेतून जाऊन आंदोलन करून संघर्ष केला. शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. ते आगरी समाजाचे नेते होते. आगरी समाजातील खर्चिक चालीरीती, रूढी, परंपरा बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या ते हृदयात आहेत. भूमिपुत्रांनी शेतकर्‍यांनी त्यांना दैवत मानले असून आज त्यांचा भूमिपुत्र एकवटला आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती, पण त्यांनी ऐकले नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात नमूद करतानाच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न 12 वर्षे चालला. विमानतळाच्या नावाचा विषय आला तेव्हा ठाणे, रायगड, मुंबईतील सर्व भूमिपुत्र एकवटला आहे. अनेक प्रकल्प होत आहेत आणि होतील त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देता येईल, पण नवी मुंबई ही ‘दिबा’साहेबांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. त्यामुळे येथील विमानतळाला फक्त दि. बा. पाटीलसाहेबांचेच नाव दिले पाहिजे व त्यासाठी आम्ही संघर्ष करीत राहणार आहोत, असेही त्यांनी सभागृहात सरकारला ठणकावून सांगितले. या वेळी आमदार महेश बालदी म्हणाले की, कोरोनाच्या काळात पूर्ण देश कोरोनाने होरपळत होता आणि सर्वांत जास्त मृत्यू मुंबईत होत असताना सिडको महामंडळाने नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केला, मात्र सर्व भूमिपुत्र आणि स्थानिक जनतेची इच्छा आहे की, विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा हा प्रस्ताव स्थानिक आणि भूमिपुत्रांच्या भावनेच्या विरुद्ध होता. साडेबारा टक्के भूखंडाचे तत्व ज्यांनी महाराष्ट्राला दाखविले त्या दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागले पाहिजे ही भूमिपुत्रांची भावना लक्षात न घेता ऑनलाइन पद्धतीने सिडकोने ठराव केला आहे आणि तो ठराव विखंडित करावा, याकरिता गेल्या जून महिन्यापासून किमान 10 वेळा आंदोलने झाली आणि स्थानिक जनतेच्या रेट्याला घाबरून राज्य सरकारने अजून तो कॅबिनेटमध्ये आणला नाही. माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की, बाळासाहेब ठाकरे मोठे होते. त्यांचे या प्रकल्पाव्यतिरिक्त शंभर  ठिकाणच्या प्रकल्पांना नाव द्या, पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव द्या. स्थानिक जनता, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि लोकप्रतिनिधींची ही मागणी आहे आणि ही बाब शासनाने लक्षात घ्यावी, असेही आमदार महेश बालदी यांनी या वेळी नमूद केले.

संघर्षमूर्ती लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा. -आमदार प्रशांत ठाकूर

शंभर प्रकल्पांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, पण नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त ‘दिबा’साहेबांचे नाव पाहिजे. -आमदार महेश बालदी

 

पनवेल महापालिकेला शासनाने योग्य जीएसटी अनुदान द्यावे; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल महापालिकेला राज्य शासनाने योग्य जीएसटी अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. पॉईंट ऑफ इन्फर्मेशननुसार त्यांनी माहितीवजा हा मुद्दा उपस्थित केला. पनवेल महापालिकेची स्थापना 2016 साली झाली. त्यानंतर जीएसटीचे अनुदान मिळावे यासाठी तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे चुकीची कागदपत्रे दाखल केली. त्यामुळे जीएसटी अनुदान कमी मिळत होते आणि आता त्यात आणखी कपात करण्यात आल्याने महापालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. जीएसटी अनुदान 28.89 कोटी रुपयांऐवजी सात कोटी व त्यानंतर आता ते चार कोटी शासनाने केले आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. हे लक्षात घेत शासनाने पनवेल मनपाला योग्य जीएसटी अनुदान देणे गरजेचे आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply