पोलादपूर ः प्रतिनिधी
पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या वतीने देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दौरा केला असून तेथील नेमकी स्थिती त्यांनी सोमवारी (दि. 9) दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली. अनेक भागातील रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी गडकरी यांना या वेळी सांगितले. या भेटीत दरेकर यांनी एक सविस्तर निवेदन गडकरींना सादर केले आणि कोकणातील उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यांसाठी निधी देण्याची विनंती या वेळी गडकरी यांच्याकडे केली. त्यावर गडकरी यांनी ही विनंती मान्य करीत कोकणासाठी केंद्र सरकारच्या वतीने 100 कोटींचा निधी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गडकरी यांच्या या सहकार्यामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …