अलिबागेत नवव्या दिवशीही उपोषण सुरूच
अलिबाग : प्रतिनिधी
आपल्या मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या अधिपरीचारिकांची प्रकृती बिघडू लागली आहे. उपोषणाचा मंगळवारी (दि 29) नववा दिवस होता. प्रकृती बिघडत असली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार अधिपरिचरिकांनी केला आहे.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण करून उत्तीर्ण झालेल्या अधिपरिचारीकांनी 18 महिन्यांसाठी शासकीय नियुक्ती मिळावी याकरीता 21 मार्चपासून समाज क्रांती आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु केले आहे. या नऊ दिवसांमध्ये आंदोलन स्थगित करण्याचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून अनेक वेळा दिले जात आहे.
अधिपरिचारीकांच्या या आंदोलनाला आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील तीनशेपेक्षा अधिक मंडळींकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषणामुळे शनिवारी बी. जी. पाटील, भाग्यश्री पाटील, शिवाजी जाधव, प्रणाली भोसले, सिध्देश्वर गायकवाड या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहनही करण्यात आले. परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी ठाम भुमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
अधिपरिचारिकांना शासकिय नियुक्ती आदेश मिळावा यासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. हे उपोषण मोडीत काढण्यासाठी आरोग्य सचिवांकडून परिचारिका नोंदणी रद्द केली जाईल, अशी धमकी पत्राद्वारे दिली जात आहे. गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मात्र आरोग्य सचिव याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
-बी. जी. पाटील, अध्यक्ष, रायगड जिल्हा समाज क्रांती आघाडी