कर्जत : बातमीदार
तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी माले गावातील मारुती अनंत भुंडेरे यांनी आपल्या कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
साळोख तर्फे वरेडी ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील माले या गावातील मारुती भुंडेरे यांना 15 व्या वित्त आयोगामधून 15 मे 2021 रोजी घरकूल मंजूर झाले आहे. हे घरकूल उभारणीचा कार्यारंभ आदेश 28 जून 2021 रोजी ठेकेदार निखिल सदाशिव बडेकर यांना दिले असल्याचे ग्रामपंचायतीने 28 फेब्रुवारी 2022 रोजी मारुती भुंडेरे यांना पत्राद्वारे कळविले होते, मात्र सदरचे काम अद्याप सुरूझालेले नाही.
दरम्यान, भुंडेरे यांचे सध्याचे राहते घर मोडकळीस आले असून, ते कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 व्या वित्त आयोगामधून मंजूर झालेल्या घरकुलासाठी मारुती भुंडेरे यांनी आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरु केले आहे. साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत सदस्य यतिश शिवराम आगीवले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे. या कुटुंबाला न्याय्य मिळेपर्यंत आपण उपोषणस्थळी उपस्थित राहणार असल्याचे यतिश आगिवले यांनी जाहीर केले आहे. या आमरण उपोषणाला ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला आहे.