Breaking News

गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय महत्त्वाचा; तो घाईघाईने का घेऊ नये?

रशिया-युक्रेन युद्धामुळे 52 हजार अंशांपर्यत कोसळलेला भारतीय शेअर बाजार गेल्या आठवड्यात साठ हजार अंशांना गवसणी घालतो आहे. याचा अर्थ एका महिन्यात तो आठ हजार अंशांनी वाढला आहे. जेव्हा बाजार पडला तेव्हा ज्यांनी गुंतवणूक घाईघाईने काढून घेतली त्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. गुंतवणुकीतून घाईघाईने बाहेर पडणे कसे नुकसानीत जाऊ शकते त्याचे हे चपखल उदाहरण होय. त्यामुळे गुंतवणुकीतून कधी बाहेर पडायचे हे तेवढेच महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.

साथीचे रोग, नैसर्गिक संकट किंवा युद्ध यामुळे बाजारात सतत चढउतार होत असतात. सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळेही असे चढउतार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशावेळी गुंतवणूकदार अनेकदा गोंधळलेल्या मनस्थितीत असतो. गुंतवणूक केल्यानंतर आपल्या गुंतवणुकीमध्ये सतत घसरण होताना दिसू लागली की, आपल्या गुंतवणुकीतून बाहेर पडावे का असा विचार त्याच्या मनात घोळू लागतो. विषय पैशाशी निगडीत असल्याने घाबरलेल्या मनस्थितीत घेतला जाणारा गुंतवणूकीमधून बाहेर पडण्याचा निर्णय बहुतेक वेळा चुकीचा ठरतो.

अनेक वेळा गुंतवणुकीमध्ये दिसत असणारे नुकसान तात्पुरते असते, परंतु गुंतवणूकदार मात्र आता माझे पैसे कमी झाले आहेत. आणखी नुकसान नको या भीतीने गुंतवणूकीतून चुकीच्यावेळी बाहेर पडण्याचा निर्णय घेत असतात. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्ये प्रत्येक गुंतवणुकदाराने आपले गुंतवणूक करतानाचे उद्दिष्ट व त्या उद्दिष्टासाठी ठरवलेला कालावधी पुन्हा एकदा तपासावा व त्या कालावधीत गुंतवणूक चालूच ठेवावी.

बाजारातील चढउतार हे नेहमीच तात्पुरत्या काळासाठी असतात. देशातील अर्थव्यवस्थेत होणारे विविध बदल, व्यवसाय-उद्योगधंद्यामधील होणारे बदल, राजकीय बदल, नवनवीन येणारे नियम व कायदे, आंतरराष्ट्रीय घटनांमुळे शेअर बाजार व आपल्या गुंतवणुकीवर तात्पुरते नकारात्मक परिणाम दिसून येतो, परंतु भारतासारख्या वेगाने वाढत असणार्‍या अर्थव्यवस्थेत असे बदल अपेक्षितच आहे. सरकारने अर्थव्यवस्थेच्या वाटचालीसाठी निश्चित केलेली उद्दिष्टे लक्षात घेता येणारा काळ निश्चितपणे अर्थव्यवस्थेसाठी व आपल्या गुंतवणुकीसाठी भरभराटीचा ठरणार आहे.

135 कोटी लोकसंख्या असलेला भारत देश ही फार मोठी बाजारपेठ आहे. आपल्या देशात औद्योगिक उत्पादने, सेवा तसेच गुंतवणुकीतीच्या क्षेत्रात प्रचंड मोठी वाढ होणार असल्याने भारतात दीर्घकाळ मंदी राहू शकत नाही. संपूर्ण जगभरात विकसित राष्ट्रांमध्ये मोठ्या वेगाने अर्थव्यवस्था वाढत नसल्यामुळे या देशातील गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक सातत्याने वाढवत आहेत. त्याला गेल्या वर्षातील काही महिने अपवाद ठरले असले तरी ते पुन्हा भारतीय बाजाराकडे वळत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. भारतीय गुंतवणूकदारदेखील काळाची पावले ओळखून पारंपरिक गुंतवणूक पर्यायातून भांडवली गुंतवणूक पर्यायांमध्ये आपली गुंतवणूक वाढवताना दिसत आहेत. म्युच्युअल फंड यामध्ये मोठी भूमिका निभावत आहेत.

येणार्‍या काळात भारतात म्युच्युअल फंडाच्या योजनांचा विस्तार आणखी मोठा होणार आहे. सरकारनेदेखील भांडवली बाजारात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे. देशातील नागरिकांचे सध्याचे वय (18 ते 50) हे एकूण लोकसंख्येच्या 60%पेक्षा जादा आहे. यामुळे या तरुण लोकांची बाजारात खरेदी क्षमता वाढली आहे. सेवा, उत्पादने व गुंतवणुकीमध्ये यांची मागणी सातत्याने वाढत आहे. सरकार देशात निर्माण होणार्‍या मंदीसदृश परिस्थितीचा विचार करुन वेळोवेळी निर्णय घेत असते. त्यामुळे सध्याची परिस्थिती येणार्‍या काळात बदलणार आहे.

गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने आपण गुंतवणूक कशासाठी करीत आहोत, कोणतं उद्दिष्ट ठरवलं आहे याचा नेमकेपणाने विचार करत असतात. आपल्या उद्दिष्टासाठी किती कालावधी लागेल याचाही विचार केलेला असतो. अशावेळी बाजारातील चढ-उताराच्या काळात प्रत्येक गुंतवणुकदाराने गुंतवणुकीतील शिस्त पाळली पाहिजे. बाजारातील चढउतार गुंतवणुकीच्या वृध्दीसाठी पूरकच ठरतात. जर बाजार केवळ एक सारखा वाढत जाणार असेल तर पुढील काळात मोठा परतावा गुंतवणूकीमधून येणार नाही. बाजारातील आजची घट उद्याच्या तेजीची नांदी असते.

गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य गुंतवणूक पर्यायांची निवड करणं आवश्यक आहे यासाठी आपल्या गुंतवणूक तज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे. बाजारातील चढ-उतारांमुळे निर्माण होणारा गोंधळ यामुळे निश्चित कमी होईल. 1979पासून 2022पर्यंतच्या कालावधीत शेअर बाजारात अनेक वेळा मंदीची परिस्थिती येऊन गेली आहे तरीही 100 अंशावर असणारा निर्देशांक आज 60 हजार अंशाला स्पर्श करताना दिसतो आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने बदल होत आहेत. या सकारात्मक परिणामांचा फायदा गुंतवणूकदारांना मिळणार आहे. पावसात भिजण्याचा प्रत्यक्ष अनुभव पाहिजे असेल तर प्रत्यक्ष पावासात जाऊन उभे रहावे लागते. अन्यथा बाकीचे भिजण्याचा आनंद घेत असतात त्यांच्या आनंदावर आपल्याला समाधान मानावे लागते. धनवर्षावाचेही तसेच आहे. प्रत्यक्ष धनवर्षावाचा अनुभव घ्यायचा असेल तर बाजारात तुमची गुंतवणूक असायला हवी. अन्यथा इतरांना धनवर्षावाचा कसा लाभ झाला याच्या गोष्टी ऐकण्यातच आनंद मानावा लागतो. तात्पर्य काय तर बाजारात चढ-उतार झाल्यामुळे घाबरून किंवा गोंधळून न जाता आपली गुंतवणूक सुरू ठेवणे आवश्यक आहे.

अनेक वेळा प्रश्न विचारला जातो की या पडझडीच्या  काळात काय करावे…

आपल्या उद्दिष्टांची पुनश्च तपासणी करा, जर उद्दिष्टांसाठी आणखीन वेळ शिल्लक असल्यास गुंतवणूक निश्चितच सुरु ठेवावी.

गुंतवणुकीतील उद्दिष्ट पूर्ततेसाठी लागणारी रक्कम गुंतवणुकीतून तयार झाली आहे का ? याचा आढावा घ्या, जर तयार झाली नसेल तर गुंतवणुकीसाठी जास्तीचा वेळ द्या. गुंतवणुकीचे मूल्य जरी तात्पुरते कमी झाले असेल आणि आपल्याकडे आणखीन गुंतवणुकीसाठी पैशाची उपलब्धता असेल, तर निश्चितच आपली गुंतवणूक वाढवावी. निवडलेला गुंतवणूक पर्याय योग्य काम करत आहे ना याची पुनश्च: चाचपणी करा. गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक वेळा शांतपणे पुनर्विचार करा. कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका, योग्य माहिती समजून घ्या मगच निर्णय घ्या. वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेचा मोठा फायदा हा आपल्या गुंतवणुकीसाठी भविष्यात होणार आहे याचे भविष्यातील होणारे मोठे फायदे आज गुंतवणुकीतून बाहेर पडून घालवू नका. भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य निश्चितच आश्वासक आहे. त्यामुळे प्रत्येक गुंतवणुकदाराने याचा होणारा फायदा आपल्या गुंतवणूकीतून घेतला पाहिजे.

गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी जितका गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय महत्त्वाचा असतो त्याही पेक्षा गुंतवणूकीतून केव्हा बाहेर पडायचे आहे हा निर्णय जास्त महत्त्वपूर्ण असतो. म्हणूनच गुंतवणूक प्रक्रिया ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनेच हाताळली पाहिजे. वेळोवळी याबाबत तपशीलवार माहिती घेऊनच निर्णय केले पाहिजेत.

-संदीप भूशेट्टी, अर्थप्रहर

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply