अलिबाग : प्रतिनिधी
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थातच गुढीपाडव्याचा सण शनिवारी (दि. 2) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. जिल्हाभरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दोन वर्षांच्या खंडानंतर मोकळेपणाने हा सण साजरा करता आल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता.
अलिबाग शहरात शनिवारी सकाळी श्रीराम मंदिर येथून स्वागतयात्रेला सुरूवात झाली. गुढीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरात ठिकठिकाणी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पारंपरिक वेषातील महिला, पुरूष, लहान मुले, भगवे झेंडे आणि फेटे, ढोलताशांचा नाद यामुळे वातावरण भारावून गेले होते.
कोरोनामुळे मागील दोन वर्षे स्वागतयात्रांमध्ये खंड पडला होता. यंदाच्या पाडव्याला सर्व निर्बंध उठल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. अलिबागबरोबरच तालुक्यातील नागाव, वायशेत, वाडगाव येथेही नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे बाजारपेठा ठप्प होत्या. उलाढाल थांबल्याने व्यापार्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर दिवाळीपासून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येवू लागले. मात्र दिवाळीत कुठलीच मोठी उलाढाल होवू शकली नव्हती, कारण लोकांच्या हातात पैसाच नव्हता. त्यानंतर वेगवेगळी कार्यालये हळूहळू सुरू झाली.
आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारपेठेत अच्छे दिन पहायला मिळाले. जिल्ह्यातील प्रमुख बाजारापेठांमध्ये गर्दी होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दालनात आणि वाहनांच्या शोरुममध्ये ग्राहकांची वर्दळ पहायला मिळाली. कपड्यामध्येसुध्दा फिल्मी स्टाइलनुसार कपडे उपलब्ध असून, त्या कपड्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी विविध आकर्षक स्किम असून, कर्ज मिळवून देण्याची सोयसुध्दा करण्यात आल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे व्यापारी सांगतात. दुसरीकडे सोने महागले असले तरी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा मोह अनेकांना आवरला नाही.
कर्जत : प्रतिनिधी
गुढीपाडव्या निमित्त कर्जतमधील अनेक संस्थानी एकत्र येऊन शहरात मराठी शनिवारी नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन केले होते. तालुक्यातील बहुतांश गावात गुढ्या उभारून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, संस्कार भारती, वारकरी सांप्रदाय कर्जत, वनवासी कल्याण आश्रम दिंडी, कपालेश्वर देवस्थान समिती, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, शिवतांडव प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, सह्याद्री प्रतिष्ठान, कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर आदींनी एकत्र येऊन शनिवारी स्वागतयात्रेचे आयोजन केले होते.
शहरातील लोकमान्य टिळक चौकातून या स्वागतयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या शोभायात्रेत साईनाथ श्रीखंडे, विनायक उपाध्ये, अभिजित मराठे, विशाल जोशी, भारती म्हसे, सुधिर साळोखे, राजाभाऊ कोठारी, विनायक चितळे, वनिता म्हसे, पद्माकर गांगल, मंदार मेहेंदळे, उल्हास दाबके आदींसह नगरसेवक, नगरसेविका आणि कर्जतमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही स्वागतयात्रा कर्जत शहरातील मुख्य बाजार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे पुन्हा टिळक चौकात आली. श्री कपालेश्वर मंदिरात सामुदायिक आरती करून स्वागतयात्रेची सांगता करण्यात आली.
या स्वागतयात्रेत ढोल पथकांनी उपस्थितांचे मन जिंकले. विशेषतः महिलांनी ढोल वाजवून आपली चमक दाखवून दिली तर वारकरी सांप्रदायने भजने गाऊन जुनी परंपरा चालू ठेवली. तालुक्यातील गावागावात घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
कर्जत : बातमीदार
नेरळ येथे नववर्ष स्वागतयात्रेच्या वतीने मिरवणूक काढून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले.स्वागतयात्रेच्या माध्यमातून नेरळ गावातील सर्व भागात नवचैतन्य निर्माण झाले होते. तर दोन वर्षाच्या कालावधीनंतर या स्वागतयात्रेच्या निमित्ताने महिला वर्गाने मोठा जल्लोष केला.
नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नेरळमध्ये शनिवारी शोभायात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेची सुरुवात सकाळी नेरळ येथील श्रीगुरुदत्त मंदिर येथून झाली. माथेरान-नेरळ स्टेशन रस्त्याने ही स्वागतयात्रा श्री गणेश मंदिर, टेपआळी, महेश चित्रमंदिर मार्गे चावडी नाका येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात पोहचली.
तेथे महिलांनी ढोलताशांच्या गजरात ठेका धरीत भगवे झेंडे हाताने उडवीत जल्लोष केला. तेथून नववर्ष स्वागतयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर पेठ, कुंभारआळी, ग्रामपंचायत कार्यालय, कुसुमेश्वर मंदिर, ब्राह्मण आळी, लोकमान्य टिळक वाचनालय, जुनी बाजारपेठ मार्गे श्रीराम मंदिर येथे पोहचली. तेथे महाआरती घेेऊन स्वागतयात्रेचा समारोप करण्यात आला.
स्वागतयात्रेत भजनी मंडळ, वारकरी मंडळ तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचे भारतमातेबद्दल माहिती देणारे रथ, घोड्यांवर स्वार झालेले मावळे, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संंख्येने सहभागी झाले होते. या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पाली : प्रतिनिधी
गुढीपाडव्याच्या दिवशी शनिवारी सुधागड तालुक्यात घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच तालुक्यातील अनेक गावे व वाड्या, वस्त्यांत शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. या शोभायात्रांत विशेषत: तरुण पारंपारिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालीत नववर्षाचा जल्लोष पहावयास मिळाला. पाली नगरी शनिवारी भव्य शोभायात्रा आणि नववर्ष स्वागतयात्रेने दणाणून निघाली. ढोल-ताशे, लेझीम पथकासह नववर्षाचे स्वागत करण्यात आले. चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यांवर काढलेल्या भव्य रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या.
पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, राजेश मपारा, सुरेश खैरे, विष्णू पाटील, राजेंद्र राऊत, सुलतान बेनसेकर, नगरसेवक सचिन जवके, गणेश सावंत, सायली ठोंबरे, संदीप दपके, श्रीकांत ठोंबरे, नरेश शिंदे, संजोग शेठ, धनंजय गद्रे आदींसह नगरसेवक व नागरिक शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पेण : प्रतिनिधी
श्री स्वामी नरेन्द्राचार्य महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन नाणीजधाम अंतर्गत उत्तर रायगड जिल्हासेवा समितीच्या वतीने शनिवारी पेणमध्ये शोभायात्रा काढण्यात आली होती. सकाळी शहरातील उत्कर्षनगर येथून या शोभायात्रेचा प्रारंभ झाला. पेणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर मार्ग, कौंडाळ तळे, राजू पोटे मार्ग, पेण नाका मार्गे ही शोभायात्रा नगरपालिका मैदानात आली. तिथे या शोभायात्रेची सांगता झाली.
स्वामीजींच्या रथासह एकूण 25 कला पथके तसेच पेणसह पनवेल, अलिबाग, कर्जत, उरण, खालापूर, रोहा, सुधागड तालुक्यातील 1800 ते 2000 भक्तगण या शोभयात्रेत सहभागी झाले होते. पेण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती दर्शन बाफना, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रसाद ढेबे, स्वरूप संप्रदायाचे गणेश मोरे, अनिल खारकर, अरुण कुथे, प्रमोद परदेशी, प्रदीप मढवी आदी या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper