पनवेल : रामप्रहर वृत्त
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलमध्ये कोरोनामुक्तीची गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त शहरामध्ये नववर्षा स्वागत समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत हजारोच्या संख्येने नागरिक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. या वेळी ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल शहरात नववर्ष स्वागत समिती पनवेलच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शहरात शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. शोभा यात्रेस पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ सुरुवात झाली असून, सावरकर चौकामध्ये याची सांगता झाली. या शोभा यात्रेचे विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले तसेच अनेकांनी सरबत, आईस्क्रिम, खाऊ, पेढ्यांचे आणि पाण्याचे वाटप केले.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, विक्रांत पाटील, नगरसेविका दर्शना भोर्ईर, रूचिता लोंढे, गुरुनाथ लोंढे, स्वाती कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय समेळ, संजय जैन, उमेश इनामदार, युवा नेते केदार भगत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते.
पनवेल : नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल येथे उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही शोभायात्रा नवीन पनवेल परिसरातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत काढण्यात आली.