Breaking News

आपट्यात एसटी बसमध्ये बॉम्ब

रसायनी : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील आपटा येथे एका एसटी बसमध्ये बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कर्जतहून आलेली बस बुधवारी (दि. 20) रात्री आपट्यात येऊन थांबली असताना कंडक्टरच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने व वाहकाने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर रसायनी पोलिसांना पाचारण करण्यात आले. मग अलिबाग येथील बॉम्बशोधक पथक येऊन सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बॉम्ब निकामी करण्यात आला.

कर्जतवरून सुटलेली वस्तीची एसटी बस (एमएच 14-बीटी 1596) आपटा बस डेपोमध्ये रात्री 10च्या सुमारास आली. त्या वेळी कंडक्टरला एका कापडी पिशवीत बॉम्बसदृश वस्तू असल्याचे दिसून आले. याबाबत त्याने व चालकाने मिळून ग्रामस्थांना याची कल्पना दिली व रसायनी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक जगदाळे, सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन बारवे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी याबाबत वरिष्ठांना अवगत केले.

बॉम्बचे वृत्त समजल्यानंतर रात्री 12च्या सुमारास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह अलिबागवरून बॉम्बशोधक व श्वानपथक घटनास्थळी पोहोचले. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल हेही पोहोचले. या वेळी रायगड पोलीस दलाचे अधिकारी, तसेच दंगल व आपत्ती नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. तोपर्यंत लोकांना याबाबत कळले असल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी सर्वांना बसपासून दूर केले होते. आलेल्या बॉम्बशोधक पथकाने पाहणी केली असता, ती वस्तू खरोखरच बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. रात्री उशिरापर्यंत हा बॉम्ब निकामी करण्याचे प्रयत्न सुरू होते. शेवटी रात्री साडेतीनच्या सुमारास बॉम्ब निकामी करण्यात यश आले. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भा.दं.वि. कलम 286 सहकलम भारतीय स्फोटक कायदा कलम 4 प्रमाणे भारतीय स्फोटक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निरीक्षक श्री. जगदाळे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बॉम्बसदृश वस्तूमध्ये ग्रॅन्युअल फॉम पावडर व इंडस्ट्रियल डेटोनेटर वापरण्यात आले आहे. ते फॉरेन्सिक लॅबला पाठविले असून, विविध मार्गांनी तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व एसटी डेपोंमध्ये बस तपासण्यात येत आहेत. तपासणी अहवालानंतर या प्रकरणाचा खुलासा केला जाईल.
-अनिल पारस्कर, अधीक्षक, रा. जि. पोलीस

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply