नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिकेने केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत तयार केलेल्या नेरूळ येथील उद्यानात जोडप्यांचा वावर सुरू झाला आहे. या उद्यानाचे काम सुरू असताना कामगारांसमोरच अश्लील चाळे करण्यात येत आहेत. त्यात भरीस भर म्हणून या उद्यानातील फुलवलेल्या हिरवळीवर नागरिक खुशाल डुलकी काढत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून उद्यानाचे उद्घाटन केवळ निमित्तमात्र उरले आहे.
नवी मुंबई महापालिकेने अमृत योजनेंतर्गत करोडो रुपये खर्च करून ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या शेजारील रखरखीत जमिनीवर हिरवळ फुलवली आहे. त्यात अनेक प्रकारची झाडे लावून सुंदर सजावट केली आहे. त्यामुळे हिरवळीचा पट्टा सर्वांनाच आकर्षित करत आहे. ज्वेल ऑफ नवी मुंबई हे नवी मुंबई, मुंबई, ठाणे व पनवेल येथील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्यात दुपारच्या वेळेस हे ठिकाण तरुण जोडप्यांचे हक्काचे मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी कुप्रसिद्ध ठरू लागले आहे. त्यात पोलीस व ज्वेलमधील सुरक्षा रक्षकांमुळे ही तरुण जोडपी थेट बाजूलाच अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या नव्या उद्यानात येऊन बसू लागली आहेत. अद्याप या उद्यानात सुरक्षा रक्षक नसल्याने व कामगार कामात मग्न असल्याने त्याचा फायदा घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर कॉलेजवयीन तरुण व तरुणींकडून दारू पिऊन धिंगाणा घातला गेला होता. प्रवेशद्वारापाशी सुरक्षा रक्षक जागेवर नसल्याने हा प्रकार घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
काम करणार्या कंत्राटदारास येथे कचरा होऊ नये यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या बाजूने उद्यानात नागरिक येत असल्याने काही दिवसांत सुरक्षा रक्षक ठेवू, तसेच ज्वेलच्या बाजूने येणार्या मार्गावर रेलिंग टाकण्यात येईल. जेणेकरून कोणीही आत येऊ शकणार नाही.
-नितीन काळे, उद्यान अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका