Breaking News

कोरोना रुग्णांमध्ये भारत दुसर्‍या स्थानी; ब्राझीलला टाकले मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतात कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. देशात कोविड-19 विषाणूने 41 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत, तर आजवर 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर पोहचला आहे. यामध्ये भारताने आता ब्राझिलला मागे टाकले आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारतापुढे आता केवळ अमेरिकाच आहे.अमेरिकेत कोरोना रुग्णांचा आकडा 62 लाखांच्या पार गेला आहे, तर एक लाख 87 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 22 लाख 83 हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत तसेच या देशात अद्याप 37 लाखांहून अधिक कोरोनाबाधित आहेत. ब्राझिलमध्ये बाधितांचा आकडा 41 लाखांवर पोहचला असून, एक लाख 25 हजारांहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या देशात 34 लाखांहून अधिक लोक आजवर बरे झाले आहेत, तर पाच लाखांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. दरम्यान, भारतात रविवारी (दि. 6) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये तब्बल 90 हजार 633 कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वांत मोठी वाढ आहे. या नवीन रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 41 लाखांच्या वर गेला आहे, तर मागील 24 तासांमध्ये 70 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांनी या आजारावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 90 हजार 633 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 41 लाख 13 हजार 812 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 70 हजार 626वर पोहचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात एक हजार 65 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांपैकी आठ लाख 62 हजार 320 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 31 लाख 80 हजार 866 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत चार कोटी 88 लाख 31 हजार 145 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी देशात 10 लाख 92 हजार 654 चाचण्या झाल्या.

अशी आहे टक्केवारी

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर)अहवालानुसार कोरोनाच्या 54 टक्के केसेस या 18 ते 44 वयोगटातील आहेत, तर कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंपैकी 51 टक्के मृत्यू हे 60 वर्षांवरील लोकांचे आहेत.

देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आठ लाख 63 हजारांहून अधिक बाधित आहेत, तर सुमारे 26 हजार लोक या आजाराला बळी पडले आहेत. त्याखालोखाल आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. तिथे चार लाख 76 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची प्रकरणे समोर आली आहेत, तर 4200हून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा क्रमांक लागतो.

रुग्णवाढीचा उद्रेक

देशात रुग्णांची संख्या एक लाख व्हायला 110 दिवस व 10 लाख होण्यास 59 दिवस लागले होते. 7 ऑगस्ट रोजी 20 लाखांचा आकडा पार झाला. 23 ऑगस्टला ही संख्या 30 लाख, तर 5 सप्टेंबरला 40 लाख झाली. रुग्णांची 10 लाख संख्या 20 लाख होण्यास 21 दिवस लागले. पुढच्या 16 दिवसांत संख्या 30 लाखांवर गेली. त्यानंतर 13 दिवसांतच आकडा 40 लाखांवर गेला.

मृत्यूदर घटला

देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असताना या आजारातून बरे होऊन घरी परतणार्‍यांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 77.23 टक्के आहे. याचबरोबर आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी होत आहे. सध्याचा कोरोनाचा मृत्यूदर 1.73पर्यंत कमी झाला आहे.

रायगड जिल्ह्यात 785 रुग्णांचा नवा उच्चांक

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 6) सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक 785 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दिवसभरात 449 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 398, अलिबाग 100, पेण 61, रोहा 41, माणगाव 38, खालापूर 37, महाड 34, कर्जत 31, उरण 20, सुधागड नऊ, श्रीवर्धन आठ, पोलादपूर सात आणि मुरूडमधील एकाचा समावेश आहे; तर मृत रुग्ण पनवेल व अलिबाग तालुक्यात प्रत्येकी तीन, माणगाव व रोहा प्रत्येकी दोन आणि खालापूर, कर्जत व पेण प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 31,592 व मृतांची संख्या 897 झाली आहे. जिल्ह्यात 25,693 जण कोरोनामुक्त झाल्याने 5002 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply