पनवेल : बातमीदार
पनवेल कल्चरल असोसिएशनचा 29वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पनवेल कल्चरल सेंटरने 29 वर्षे पूर्ण करीत 30व्या वर्षात पदार्पण केले आहे.
पनवेल कल्चरल असोसिएशन गेली अनेक वर्षे पनवेल परिसरातील सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करत आहे. संस्थेचे पं. पलुस्कर संगीत विद्यालयात गायन, हार्मोनियम, तबला चित्रकला, कथ्थक आदी कलांचे शिक्षण शंभरहून अधिक विद्यार्थी घेत आहेत. राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी संस्था करत असते. संस्थेच्या 30व्या वर्षाच्या निमित्ताने संस्थेचे जयंत टिळक, मिलिंद पर्वते, श्रीधर सप्रे, नंदकुमार कर्वे, स्नेहा सोमण, चंद्रकांत मने, मिलिंद गोखले, महेश गाडगीळ, अनिरुद्ध भातखंडे आदी माजी अध्यक्ष, पदाधिकारी नव्या उत्साहाने पुन्हा संस्थेच्या कार्यात सहभागी होत असल्याची माहिती पदाधिकार्यांनी दिली. 27 एप्रिल रोजी संस्था तिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच ज्येष्ठ नागरिक संघात शास्त्रीय गायनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोन सत्रात झालेल्या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात किराणा घराण्याचे बुजूर्ग गायक पंडित फिरोज दस्तूर यांचे शिष्य पंडित चंद्रशेखर वझे यांचे गायन झाले. त्यांना
हार्मोनियमवर अनिरुद्ध गोसावी, तर तबल्यावर ऋग्वेद देशपांडे यांनी साथसंगत दिली. सायंकाळच्या सत्रात ज्येष्ठ तबलावादक पंडित बापू पटवर्धन व व्ही. के. हायस्कूलचे माजी प्राचार्य के. डी. म्हात्रे यांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. नंदकुमार कर्वे यांना अलीकडेच मिळालेल्या कीर्तन भूषण पुरस्काराबद्दल त्यांचाही संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून धनश्री लेले यांनी ‘गदिमांची काव्य प्रतिभा’ या विषयावर मार्गदर्शन केले. गीत रामायणातील गीतांव्यतिरिक्त, चित्रपटगीते, कविता, सवाल जबाब, बालगीते आदींमधील अनेक सौंदर्यस्थळे त्यांच्या व्याख्यानात उलगडली. असेसिएशनच्या मावळत्या अध्यक्षा ज्योत्स्ना देऊसकर यांनी नवनियुक्त अध्यक्ष मोहन शिरोडकर यांच्याकडे संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली.