आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती
चौक ः प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या चौक विभागातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी कर्तव्याची जाणीव व सक्षम नेतृत्व आमदार महेश बालदी असल्याने उरण मतदारसंघात विकासाची गंगा अवतरली आहे, असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमास आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, युवा मोर्चा तालुका सचिव प्रवीण मोरे, सरपंच रितू ठोंबरे, सरपंच रवींद्र कुंभार, सरपंच प्रितेश मोरे, माजी उपसरपंच गणेश कदम, दत्ता मांडे, उपसरपंच सुयोग भालेकर, सरपंच सुहास कदम, दीपक पंदेकर, सरपंच रेश्मा ठोंबरे, सहाय्यक अभियंता राकेश राखाडे, मिना ठोंबरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार महेश बालदी यांनी, विकासकामांसाठी आणलेल्या निधीचा विनियोग योग्य आणि गरजेच्या ठिकाणी होत असल्याने केलेल्या परिश्रमाचे फलित होत असल्याने एक वेगळा आनंद मिळत असल्याची भावना व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, येत्या काळात मतदारसंघातील प्रत्येक गावात सुविधा पुरविण्यास मी बांधील असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
थंड हवेचे ठिकाण माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या हाशाची पट्टी व इतर दुर्गम, दुमीर्र्ळ, डोंगराळ ठिकाणच्या वाड्यांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत वनमंत्री व संबंधित खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकार्यांची बैठक आयोजित केली असून तेही प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला.
या वेळी लोधिवली मुख्य रस्ता, तुपगाव येथे गेली अनेक वर्षे रस्त्यापासून वंचित असलेला स्मशानभूमी रस्ता व जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, हातनोली गावासाठी गणेश घाट बांधणे, वावंढळ गाव रस्ता, कलोते रस्ता, पोखरवाडी ते सोंडेवाडी, आंबेवाडी, बोरगाव, काटवन रस्ता, तारावाडी नळ पाणीपुरवठा योजना, चिचमाळ, निगरपट्टी, निंबरवडी, टेपाची वाडी, दांड वाडी, बुरुज वाडी व बापदन वाडी या आदिवासी व दुर्गम भागात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, चौक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे यांचा वाढदिवस या वेळी साजरा करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रशासकीय कामांची माहिती असलेली पुस्तके व गाथा भेट म्हणून दिली.