अलिबाग : केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत मुरूड तालुक्यातील काशीद येथील जेटीचे काम 50 टक्के पूर्ण झाले असून भाऊचा धक्का ते काशीद ही रो-रो सेवा डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकल्पावर 112 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे काशीद येथे येण्यासाठी मुंबईहून लागणारा वेळ वाचणार असल्याने पर्यटकांची संख्याही वाढणार आहे.
काशीदचा समुद्रकिनारा देश-विदेशातील पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतो. सुटीचे दिवस आणि आठवडाअखेर तर हा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून जातो. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळेच केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामुळे दोन तासांत हा किनारा गाठणे शक्य होणार आहे. पार्किंग व्यवस्था, टर्मिनल इमारत अशी कामेही या ठिकाणी करण्यात येत आहेत. त्यामध्ये तिकीट सुविधा, प्रवाशांसाठी आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, जोडरस्ता, पाणी अशा अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत.
काशीद ते भाऊचा धक्का या रो-रो प्रकल्पामुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच काशीद मुंबईच्या अगदी जवळ येणार आहे. रस्ता व अन्य सुविधांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
-मनीष मेटकर, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड