पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या चार दशकांपासून तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनविणारा बुरूड व्यवसायदेखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूच्या वस्तू बनविणारे पारंपरिक बुरूड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील गायकवाड कुटुंबातील महिलांनी जातीचा पारंपरिक व्यवसाय सामाजिक ओळख म्हणून अद्याप सुरू ठेवला आहे. दरवर्षी, गणपती गौरीच्या सणाला माहेरवाशिणींचे गौरीचे ओवसे घेऊन जाण्यासाठी लागणारी बांबूची सुपे, सुपल्या तसेच परड्या, करंड्या, पाट्या, कणगे, डालगे, टोपल्या, चटई, सुपे, रवळ्या तसेच शो-पीस बनवून पोलादपूर शहरात विक्रीसाठी उपलब्ध करीत आहे. पोलादपूर तहसील कार्यालयाच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंपाऊंडलगत या व्यवसायातील परजिल्ह्यातील कारागिरांनी बांबूपासून शेतीसाठी उपयुक्त वस्तू तयार करून विक्रीचा व्यवसाय दरवर्षी थाटण्यास सुरुवात केली आहे. यासाठी स्थानिक शेतकर्यांकडूनच कच्चा माल म्हणून बांधावरचे बांबू अत्यंत कमी किंमतीत विकत घेत. त्याच्या वस्तू हे परजिल्ह्यातील कारागिर तयार करीत असतात, मात्र या पारंपरिक बुरुड व्यवसायाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. पूर्वी पोलादपूरप्रमाणेच ग्रामीण भागात दारोदारी फिरून बांबूपासून बनविलेल्या वस्तूंची विक्री केली जात असे. अल्प गुंतवणुकीच्या या व्यवसायातून त्याकाळीदेखील नफा दुप्पट मिळत असे. सध्या तालुक्यातील बुरूड व्यावसायिक अन्य व्यवसायात कर्तृत्व गाजवित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही स्थानिक बुरूड दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळेच आता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, येथून पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह आलेल्या कारागिरांनी आपल्या हस्तकौशल्यातून सुबक व आकर्षक वस्तू बनवून लोकांचा विश्वास संपादन केला. या व्यवसायातून त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडे पैसा खेळू लागला. शहरातील मोक्याच्या जागेत या परजिल्ह्यातील कारागिरांनी आपला तळ ठोकला. दरवर्षी परजिल्ह्यातून आलेल्या या लोकांनी स्थानिक बुरूड व्यवसायिकांसमोर उत्पादनाच्या सातत्याने या व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण केली. राज्याच्या मंत्रिमंडळाने बांबूच्या शास्त्रोक्त लागवड आणि औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. नवीन बांबू धोरण जाहीर करण्यात येत असून त्याअंतर्गत या केंद्रातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच धर्तीवर कोकणातही असे केंद्र कार्यान्वित होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. या ठिकाणी बांबूवर आधारित डायरेक्टर जनरल ऑॅफ एप्लॉयमेंट अँड ट्रेनिंग या भारत सरकारच्या विभागातर्फे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. या केंद्रांतून मॉड्युलर एम्प्लॉएबल स्कील्सअंतर्गत बांबू प्रोसेसिंग, सेकंडरी बांबू प्रोसेसिंग, बांधकामासाठी बांबूचा उपयोग, बांबूपासून फर्निचर तयार करणे, त्याचप्रमाणे बांबू टर्निंग प्रॉडक्ट आणि फाईन बांबू प्रॉडक्ट हे उच्च प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येणार असून राज्यमंत्रिमंडळाने या प्रशिक्षण केंद्राकरीता संचालक व अन्य 22 पदनिर्मिती तसेच इतर खर्चापोटीसुमारे 11 कोटी 12 लाख इतक्या खर्चास मान्यता दिली आहे, मात्र, चंद्रपूरच्या धर्तीवर कोकणातही या बांबू उद्योगाला प्रोत्साहन मिळाल्यास या बुरूड व्यवसायाचे पुनरूज्जीवन होऊ शकेल. सध्या राज्यात 7 हजार 900 नोंदणीकृत बुरुड असून 30 ऑगस्ट 1997 नंतर नवीन बुरुडांची नोंदणी करण्यात आली नाही. राज्यातील नवीन बुरुडांची नोंदणी करणे तसेच बुरुड कारागिरांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून स्वामित्व शुल्क न आकारता बांबूचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेताना स्वामित्व शुल्कातील सवलत प्रति कुटुंब प्रतिवर्षी 1500 बांबू इतक्या मर्यादेत देण्याचाही निर्णय घेतला आहे. पोलादपूर तालुक्यातील त्वष्टा कासार व्यावसायिक व जात अस्तंगत झाल्यापासून तांबे आणि पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणार कोण? या समस्येपोटी स्टेनलेस स्टीलच्या भांडयांनी पोलादपूरकरांच्या संसारातून तांबे अन् पितळेच्या भांड्यांना हद्दपार केले आहे. अनेकांनी भंगार व मोडीमध्ये तांबे, पितळयाच्या भांडयांसह बिडाच्या तव्यांनादेखील अल्पमोबदल्यात विकून अडगळ कमी केली आहे. त्यामुळे तालुक्यातील बुरूड व्यवसायातील कारागिरांची घटणारी संख्या चिंताजनक असून कोकणात पर्यटनाचे वारे वाहताना पारंपरिक व्यवसायांना चालना देण्याच्या सरकारी प्रयत्नांचा लाभ घेत तालुक्यातील युवकांनी या व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. पर्यटकांना आकर्षित करणार्या नवनवीन शोभिवंत वस्तूंची निर्मिती बांबूपासून केल्यास आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल. वाढती बेकारी, कर्ज घेऊन उद्योग सुरू करताना निर्माण होणार्या अडचणी, यामुळे अनेक बेरोजगार वैफल्यग्रस्त असताना त्यांना अत्यंत कमी भांडवलात उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय फायदेशीर आहे, मात्र, आता कोकणातील लोकप्रतिनिधींनी चंद्रपूरच्या धर्तीवर कोकणातही या व्यवसाय प्रशिक्षणासाठी मागणी लावून धरण्याची गरज आहे.
-शैलेश पालकर