Tuesday , March 28 2023
Breaking News

ग्रामविकासाला चालना ; अलिबागेत जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळा उत्साहात

अलिबाग :  जिमाका

गावा-गावात तयार केलेल्या बचतगटांना बँकानी पतपुरवठा केल्यास बचतगटांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी निर्माण होऊन ग्रामविकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी मंगळवारी (दि.2) येथे केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्हा परिषद सभागृहात मंगळवारी जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन दिलीप हळदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. स्वयंसहाय्यता बचत गटांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी त्यांना बँकामार्फत पतपुरवठा करण्यात येतो. त्याचा योग्य लाभ घेऊन बचत गटांनी आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन हळदे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. बचत गटांची बांधणी करणे, बंद असलेल्या बचत गटांना पुनर्जीवीत करणे, त्यांना फिरता निधी देणे, पतपुरवठा करणे याबाबतची माहिती व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यशाळेत 2018-19 या वित्तीय वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बँक अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रामदास बघे, गटविकास अधिकारी अविनाश घरत, कोकण विभागाचे आर्थिक समावेशक सल्लागार कासवटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  निखिलकुमार ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट, प्रशिक्षक एल. रामचंद्र रेड्डी, पी. मोहनीया यांच्यासह जिल्ह्यातील बँकाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिला या एक दिवसीय कार्यशाळेला उपस्थित होत्या. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर.पी. बघे व त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply