नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
शीव-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी सिडकोच्या तुर्भे ते खारघर या सहा किमीच्या भुयारी मार्गाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिडकोने सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तुर्भे-खारघर भुयारी मार्गाची मागणी भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात वळविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने तुर्भे औद्योगिक वसाहत ते खारघर हा सहा किमीच्या भुयारी मार्गाचा प्रस्ताव सुचविला आहे. सध्या अशा प्रकारे ऐरोली ते कटई नाका या 12 किमीचे भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी एक हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला जात असून या मार्गावरील पहिली मार्गिका या वर्षअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. ऐरोली येथील जमीन संपादन करून हा आडमार्ग काढण्यात आला आहे. यामुळे शिळफाटा मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
भाजप आमदार गणेश नाईक यांची अधिवेशनात मागणी
नवी मुंबईत दळण-वळणाची साधने वाढविण्यासाठी कांजूरमार्ग कोपरखैरणे चौथा खाडी पूल व तुर्भे-खारघर भुयारी मार्गाची मागणी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.