पाली : प्रतिनिधी
स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव विकास समिती मार्फत नुकतेच पाली तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सुधागड तालुक्यामधील 15 गावातील 26 आदिवासी बांधव व शेतकर्यांना शेळी संचाचे वाटप करण्यात आले.
उस्मानाबादी जातीच्या दोन शेळ्या व प्रथमोपचार साहित्य यांचा या शेळी संचात समावेश असून, बाजार भावाप्रमाणे प्रत्येक संचाची किंमत 19हजार रुपये इतकी आहे. शेळी संच वाटपाच्यावेळी नायब तहसीलदार दिलीप कोष्टी, स्वदेस फाऊंडेशनच्या व्यवस्थापिका निता हरमलकर, संचालक अमित गुप्ता, डॉ. सुरेंद्र यादव, विकास करमाले व नितीन गुरव आदी उपस्थित होते.
या वेळी शेतकर्यांना शेळी संगोपनाविषयी प्रशिक्षण देण्यात आले. सुधागड तालुक्यातील तब्बल 350 शेतकर्यांनी शेळ्या मिळण्यासाठी नावनोंदणी केली आहे, त्यांनादेखील लवकरच शेळी संचाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.