Breaking News

राजकारणातील सूडसत्र

राज्यातील सत्ताधार्‍यांच्या मते एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांचे नेते अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे भारतीय जनता पक्षाचेच बगलबच्चे आहेत. न्यायालयाने सदावर्ते यांना फक्त दोन दिवसांची कोठडी वाढवून दिल्यानंतरही सदावर्तेंना दणका मिळाल्याचा आनंद सत्ताधारी व्यक्त करीत आहेत. भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आयएनएस विक्रांत निधी संकलन प्रकरणीचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क सोमय्यांना आहेच, परंतु भाजपला मिळालेल्या या दोन्ही तथाकथित न्यायालयीन दणक्यांमुळे सत्ताधारी नेत्यांना आनंदाचे भरते आले आहे. विभिन्न विचारसरणींचे पक्ष लोकशाहीचे अलंकार असतात. परस्परांच्या विचारसरणीचा आदर ठेवूनच आपले मतभेद ठामपणे मांडण्याबद्दल लोकशाही आग्रही असते. अशा प्रगल्भ वातावरणातच लोकशाही खर्‍या अर्थाने फळते, फुलते. स्वातंत्र्यानंतर जवळपास अर्धशतकाहून अधिक काळ असेच वातावरण भारतीयांनी पाहिले. महाराष्ट्रात तर परस्परांचा आदर राखून राजकारण करणार्‍या नेत्यांची परंपराच आहे. तथापि गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये राज्यातील राजकारणाची पातळी इतक्या खालच्या स्तरावर गेली आहे की हाच का तो महाराष्ट्र? असा प्रश्न कुठलाही सुजाण नागरिक विचारेल. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच या सूडसत्राला सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल. जनादेशाला केराची टोपली दाखवून सत्तेवर आलेल्या तीन पक्षांच्या कडबोळ्याला यापेक्षा दुसरे काही करताही येणार नाही हा भाग वेगळा. गेल्या अडीच वर्षांच्या रडतखडत चालवलेल्या मविआ सरकारच्या कारकीर्दीमध्ये भ्रष्टाचाराचा आणि सुडाच्या राजकारणाचा कळस गाठला गेला आहे. त्याचीच परिणती आता विखारी राजकारणात झालेली दिसून येते. मविआचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानावर एसटी कर्मचार्‍यांमधील शंभर- दीडशे आंदोलकांनी हल्ला केला. त्या प्रकरणी एसटी कामगारांचे पुढारी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने आणखी दोन दिवस कोठडी वाढवून दिली. सरकारी वकिलांनी भरमसाठ आरोप करीत अ‍ॅड. सदावर्ते यांना किमान 11 दिवस पोलीस कोठडी मिळायला हवी असा युक्तिवाद केला होता. हा युक्तिवाद करताना त्यांनी पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला सुनियोजित आणि षडयंत्राचा भाग होता, असा दावा केला. सदावर्ते यांच्या वकिलांनी तिथल्या तिथे सरकारी वकिलांच्या युक्तिवादाच्या चिंध्या केल्या. ज्या घटनेमध्ये एकाही घराची काच फुटली नाही, कोणीही जखमी झाले नाही, त्याला सुनियोजित षडयंत्र कसे म्हणायचे? असा प्रतिसवाल त्यांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची कोठडी वाढवून दिली. असे असूनही सदावर्ते यांना दणका मिळाल्याचा आनंद सत्ताधारी नेते व्यक्त करीत आहेत. गेली अडीच वर्षे हेच सत्ताधारी मविआचे नेते विरोधकांचे सपाटून जोडे खात आले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये यांचे दोन मंत्री गजाआड आहेत आणि किमान अर्धा डझन मंत्री आणि नेते रांगेत आहेत. अर्थात त्यांना रांगेत उभे करण्यामध्ये सोमय्या यांच्यासारख्या निडर नेत्याचा वाटा मोठा आहे. किंबहुना सत्ताधार्‍यांना सळो की पळो करणार्‍या सोमय्या यांना त्यांच्या निडरपणाचीच किंमत मोजावी लागत आहे. महाराष्ट्राची जनता हे सारे उघड्या डोळ्यांनी बघत असल्यामुळे राजकारणातील हे सूडसत्र कोणी आरंभले आहे हे स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारचे राजकारण ना महाराष्ट्राने कधी पाहिले ना अनुभवले. हे सूडसत्र थांबवण्याचा एकमेव उपाय मतदारांच्याच हाती आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply