Breaking News

चकमक म्हणजे न्याय?

पोलिसांनी आरोपींना अशातर्‍हेने चकमकीत मारणे हे कायद्याला धरून नसल्याची प्रतिक्रिया मान्यवरांकडून व्यक्त झाली आहे. या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या चकमकीमुळे त्या दुर्दैवी तरुणीस न्याय मिळाल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया ही भावनिक आहे. परंतु म्हणून ते योग्य ठरत नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया योग्य रीतीने पार पाडून अत्यंत वेगाने खटला चालवून कायद्याच्या चौकटीत त्यांना शिक्षा ठोठावायला हवी होती.

शुक्रवारी देशभरातील बहुतेकांच्या दिवसाची सुरूवात हैदराबादेतील बलात्कार प्रकरणीच्या आरोपींच्या एन्काऊंटरने झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासकामासंबंधात पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेले होते. या वेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना गोळीबार करून ठार केले. हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यापासून देशभर संताप व्यक्त करण्यात येत होता. या प्रकरणी प्रारंभी पोलिसांकडून हेळसांड झाल्याचेही समोर आले होते. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिताफीने पावले उचलली असती तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता. यासंदर्भात टीकेचे लक्ष्य ठरल्याने पोलीस दबावाखाली होते. आरोपींना आमच्या हवाली करा, आम्ही न्याय करतो, या पशूंना लागलीच गोळ्या घाला, ते या जगात राहण्याच्या लायकीचे नाहीत अशा घोषणा स्थानिक लोकांकडून या प्रकरणी दिल्या गेल्या होत्या. आरोपींना घेऊन जाणारी वाहनेही जमावाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. या सार्‍या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बहुदा पोलिसांना स्वत:ची इभ्रत वाचवण्यासाठी काही करणे भाग होते. शुक्रवारी सकाळी या आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केल्याची बातमी आली आणि लगेचच या प्रकरणी न्याय झाल्याची भावना जनसामान्यांकडून व्यक्त होऊ लागली. हे प्रकरण कोर्टात जाते तर तिथे पाच-सहा वर्षे ते रेंगाळत पुढे सरकले असते. त्यानंतर शिक्षा ठोठावल्यानंतर देखील लागलीच तिची अंमलबजावणी होण्याची शक्यताही कमीच असते. त्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी त्या दुर्दैवी तरुणीला न्याय मिळवून दिल्याबद्दल स्थानिक तसेच देशभरातील सर्वसामान्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. हैदराबादमधील या बलात्कार प्रकरणाने सगळ्यांच्याच दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाच्या आठवणी जाग्या झाल्या. आज सात वर्षे उलटली तरी अद्यापही त्या प्रकरणीच्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. सर्व न्यायालयीन टप्पे पार पाडत अखेर त्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली गेली असली तरी काय तर म्हणे, जल्लाद उपलब्ध नसल्याने त्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवरच जनतेकडून हैदराबादेतील पोलिस चकमकीचे समर्थन केले जात असले तरी समाजातील अनेक सुजाण नागरिक व मान्यवरांनी मात्र आरोपींना अशातर्‍हेने चकमकीत ठार मारण्याची पद्धत चुकीची असल्याचे मत नोंदवले आहे. हैदराबादच्या पोलिसांनी केलेला न्याय हा चंबळच्या डाकूंकडून केल्या जाणार्‍या न्यायासारखा आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. आरोपींचे हात-पाय तोडण्याच्या आणि शहानिशा न करता देहदंड देण्याच्या पद्धती काही अरब राष्ट्रांमध्ये आहेत. आपला कायदा व न्यायसंस्था ही त्यांच्यापेक्षा अधिक विकसित व सुसंस्कृत समाजाला साजेशी असल्याचे आपण मानतो. त्यामुळेेच न्यायाला विलंब होतो म्हणून चकमकींचे समर्थन कुणीही विवेकी व्यक्ती करू शकणार नाही.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply