पेण : प्रतिनिधी
कार्ल्याच्या एकवीरा देवीची यात्रा 8 एप्रिल रोजी उत्साहात पार पडली असून, आता रामनवीपासून ते अक्षय्य तृतीयेपर्यंत पेणमधील ग्रामदेवतांच्या यात्रांचा माहोल रंगणार आहे. कोरोना महामारीमुळे घातलेल्या निर्बंधांमुळे दोन वर्ष यात्रा भरल्या नव्हत्या मात्र यंदा निर्बंध उठविल्याने आता यात्रा, उत्सवांना मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. एकविरा देवीच्या यात्रेनंतर पेण तालुक्यातील गावोगावच्या ग्रामदेवींच्या उत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील विशेषतः बोरी, वाशी, गडब या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. तसेच वढाव, वाशी, पांडापूर, दादर, रावे, जिते, कळवा, वरेडी, मळेघर, उंबर्डे, कोलेटी, गडब, काळेश्री व अन्य ठिकाणी ग्रामदेवींच्या उत्सवाचा व यात्रेचा कार्यक्रम होत असतो. तालुक्यात वाशीच्या जगदंबेचा व बोरीच्या आकादेवीच्या यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून खारेपाटातील हजारो भाविक या यात्रेत सामील होत असतात. यात्रेत देवकाठ्या उभारण्याच्या स्पर्धा पाहण्यासाठी व त्या उभारण्यासाठी आगळेवेगळे चैतन्य पाहायला मिळते. येथील यात्रेनिमित्त पालखी सोहोळा वाजत-गाजत मंदिरामध्ये येत असतो. सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरु असणार्या यात्रेत हजारो भाविक जगदंबेच्या व आकादेवीच्या दर्शनासाठी रांगा लावून दर्शन घेत असतात. वाशीच्या जगदंबेच्या यात्रेनिमित्ताने विविध प्रकारची दुकाने, मेवा-मिठाईची दुकाने मांडण्यात येत असतात. तसेच मोठमोठी करमणुकीची साधने भाविकांसाठी उपलब्ध करण्यात येत असतात. या यात्रांसाठी ग्रामस्थांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येत असते. वढावच्या बहिरीदेवी यात्रेनिमिताने भाविक अंगावर काटेरी पेरकुट मारुन घेतात. बहिरीदेवाची पालखी गावातून निघाल्यानंतर एक वेगळाच उत्साह ग्रामस्थामध्ये निर्माण होत असतो. या ठिकाणीही मोठी यात्रा भरत असून देवकाठ्या उभारण्याच्या स्पर्धा ठेवल्या जातात. मुंबईस्थित खारेपाटातील भाविक आवर्जून या यात्रोत्सवांना व पालखी सोहळ्याला हजर राहून यात्रेचा आनंद घेत असतात. त्याचबरोबर गडब येथील काळंबादेवीची यात्राही मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात येते. या ठिकाणीही देवीची पालखी सोहळा व देवकाठ्या उभारुन यात्रेचा आनंद घेतला जातो. हमरापूर, कळते, दादर, जोहे, तांबडशेत या गणेशमूर्ती कलानगरीतील तब्बल 20 ते 25 हजार भाविक काळभैरव यात्रेचा मनमुराद आनंद लुटतात. चैत्रातील त्रयोदशी व चर्तुदशीला वढावच्या बहिरीदेवीची यात्रा आहे. वाशीच्या जगदंबेच्या यात्रेला तब्बल दोन लाख भाविकांची मांदियाळी जमते. मंगळवार 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती, या दिवशी पेणच्या 171 गावापैकी 148 गावांतील हनुमान मंदिरात रामभक्त हनुमानाचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो. यामध्ये शिर्की गावात आठवडाभर हनुमान जयंती उत्सव मोठ्या भावभक्तीने साजरा होतो. किर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन, व्याख्याने व विविध गुणदर्शन कार्यक्रमाची या ठिकाणी रेलचेल असते. याच दिवशी बोरी गावची आकादेवीची यात्रा व गडब काळबादेवीची यात्रा, कळते येथे हनुमान जयंती यात्रा, असा पौर्णिमेच्या दिवशी यात्रांचा मोठा माहोल असतो. 18 एप्रिलला वरेडी गावच्या बहिरीदेवाची यात्रा, त्यानंतर 30 एप्रिलला रावे गावच्या रायबादेवीची यात्रा असते. तर अक्षयतृतीयेला जिते गावची लक्ष्मी नारायणदेवीची यात्रा असून, या यात्रेने पेण तालुक्यातील ग्रामदेवतांच्या यात्रांची सांगता होते.