तरीही घरगुती मसाला बनवण्याकडे गृहिणींचा कल
उरण ः वार्ताहर
लाल मिरची खरेदीसाठी सध्या उरण बाजारात मोठी लगबग पाहण्यास मिळत आहे. घरगुती तिखट, तसेच मसाला तयार करण्यासाठी म्हणून लाल मिरचीला मोठी मागणी आहे. यंदा तुलनेने आवक कमी असल्याने भाव चांगलेच वधारल्याचे चित्र आहे. अवघ्या 40 दिवसांतच लवंगी, गुंटूर, चपाटासह काश्मिरी मिरचीच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.
लवंगी 260 रूपये किलो, बेडकी 320 ते 360 रूपये किलो, गुंटूर चपाटा 340 रूपये किलो, संकेश्वरी 280 रूपये किलो, काश्मिरी 440 रूपये किलो अशा दराने तिखट लवंगी मिरची उपलब्ध आहे. खरेदीसाठी काही दिवसांपासून ग्राहकांची मोठी रेलचेल दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत लाल मिरचीचे भाव दर्जानुसार आठ ते 15 टक्क्यांनी वाढले असतानाच, 40 दिवसांतच लवंगी, गुंटूरच्या दरात किलोमागे सुमारे 20 रूपयांची, चपाटाच्या दरात 30 ते 40 रूपयांची, तर रसगुल्लाच्या दरात तब्बल 90 ते 100 रूपयांची दरवाढ झाली आहे. मसाला तयार करण्यासाठी लागणार्या तेजपानसह विविध वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. यात चांगल्या दर्जाची अख्खी हळद किलोमागे 20 ते 30 रूपयांनी महागली आहे. हळदीचा भाव सध्या 140 ते 170. यांसह धणे 120 ते 170 रूपये किलो, तेजपान 70 ते 90 रुपये, शहाजिरे 550 ते 750 रूपये असे दर असून यांसह हिरवी वेलची, दालचिनी, काळे मिरे, कर्णफूल, दगडफूल, रामपत्री, जावत्री, त्रिफळा आदींना मागणी असल्याचे मिरची विक्रेत्यांनी सांगितले.
घरचे तिखट, मसाल्याची चवच न्यारी. त्यामुळे वर्षभर पुरेल इतके लाल तिखट, घरगुती मसाला तयार करून घेण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे. आम्ही दरवषी घरीच तिखट मसाला बनवतो.
-रजनी मानापुरे, पाल्याची वाडी, केगाव-उरण